लखनऊमध्ये भारताचे विजयी फटाके, मालिकाही जिंकली
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७१ रननी विजय झाला आहे.
लखनऊ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७१ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ३ टी-२० मॅचची ही सीरिज २-०नं जिंकली आहे. भारतानं ठेवलेल्या १९६ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १२४ रन करता आले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर फॅबियन अॅलनला कृणाल पांड्यानं रन आऊट केलं. वेस्ट इंडिजकडून डॅरेन ब्राव्होनं सर्वाधिक २३ रन केले.
या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारतानं २० ओव्हरमध्ये १९५-२ एवढा स्कोअर केला. रोहित शर्मानं ६१ बॉलमध्ये नाबाद १११ रनची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता.
भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं १२३ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. शिखर धवननं ४३ रनची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत ५ रनवर आऊट झाला. तर लोकेश राहुलनं १४ बॉलमध्ये नाबाद २६ रन केले. वेस्ट इंडिजकडून खेरी पिरे आणि फॅबियन अॅलेननं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं शेवटच्या ओव्हरमध्ये २० रन दिले. यातले १९ रन रोहितनं केले. ब्रॅथवेटच्या पहिल्या बॉलला १ रन काढून राहुलनं रोहितला स्ट्राईक दिला. यानंतर रोहितनं लागोपाठ ३ फोर आणि १ सिक्स मारले.
रोहितचा विक्रम! विराटलाही मागे टाकलं
याचबरोबर रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक रन करणारा फलंदाज ठरलाय. रोहितने विराट कोहलीला मागे टाकलंय. विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ४८.८८ च्या सरासरीने २ हजार १०२ धावा केल्या आहेत. तर रोहितने कारकीर्दीतील ८५व्या टी-२० सामन्यात विराटला मागे टाकले.
विंडीजविरुद्धच्या या सामन्यात अकरावी धाव घेताच रोहित भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आता आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं ८६ टी-२० मॅचच्या ७९ इनिंगमध्ये ३३.८९ ची सरासरी आणि १३८.६४ च्या सरासरीनं २२०३ रन केले आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे. त्याने ७५ सामन्यांत ३४.४० च्या सरासरीने २ हजार २७१ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १०६ सामन्यांत ३१.३१ च्या सरासरीने २१६१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम २ हजार १४० धावांसह चौथ्या स्थानी आहे.
आता रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ४ शतकं झाली आहेत. तर कर्णधार म्हणून हे रोहितचं दुसरं टी-२० आंतरराष्ट्रीय शतक आहे. २ शतकं करणारा तो एकमेव कर्णधार आहे. तर आता टी-२०मध्येही सर्वाधिक शतकं रोहितच्या नावावर आहेत.