Company Decision After India World Cup loss to Australia: भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. हा पराभव खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात रडू आलं तर क्रिकेट चाहत्यांना दुसऱ्या दिवशी सोमवार असून ऑफिसला जायलाही नकोसं झालं. हीच गोष्ट लक्षात घेत एका कंपनीने चक्क भारताचा पराभव झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी एका दिवसाची सुट्टी जाहीर केली. 


कंपनीने केलं असं काही की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत सहाव्यांदा चषक जिंकला. जवळपास सव्वा लाख भारतीय प्रेक्षकांसमोर हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने भारतीय चाहत्यांना अगदी रडवल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र भारताच्या या पराभवानंतर एका कंपनीने तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली. एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर कंपनीने पाठवलेल्या ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये भारताच्या पराभवामधून सावरण्यासाठी तुम्हाला ही सुट्टी देत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ही सुट्टी पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि सावरण्यासाठी आहे असं कंपनीने म्हटलंय.


कोणी आणि काय पोस्ट शेअर केली आहे?


"हा केवळ पराभव नव्हात तर 140 कोटी भारतीय यामुळे निराश झालेत. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये 19 नोव्हेंबर 2023 हा दिवस फार निराशाजनक म्हणून नोंदवण्यात आला आहे. याच दिवशी भारतीय संघाला वर्ल्ड कप चषक उंचावण्यात अपयश आलं. भारतीय संघाने संपूर्ण देशाला पुन्हा वर्ल्ड कप जिंकू अशी आशा दाखवली होती. मात्र वर्ल्ड कप भारतात परत येईल ही अपेक्षा दुर्देवाने भंग पावली. या वर्ल्ड कपची क्रेझ कोणापासून लपून राहिलेली नाही. देशातील सर्व नेटकरी या वर्ल्ड कपबद्दलच बोलत आहेत," अशा मजकुरासहीत दिक्षा गुप्ता या तरुणीने कंपनीने पाठवलेला ई-मेल शेअर केला आहे. दिक्षा ही मार्केटींग मुव्हस एजन्सीमध्ये काम करते. पुढल्या काही ओळींमध्ये दिक्षाने बॉसने कशाप्रकारे सुट्टी जाहीर केली याबद्दल भाष्य केलं आहे.


"आज सकाळी मी झोपेतून उठले तर माझ्या बॉसने मला पाठवलेला हा मेसेज मिळाला. भारतीय संघाच्या पराभवातून सावरण्यासाठी बॉसने सर्वांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. अधिकृत ई-मेल येईपर्यंत आमचा यावर विश्वास बसत नव्हता. या एका दिवसाच्या आरामामुळे आम्हाला बुस्टर तर मिळालाच पण या ब्रेकमुळे मानसिक दृष्ट्या आम्हाला शांत होण्याची संधी मिळाल्याने दुसऱ्या दिवशी आम्ही अधिक उत्साहाने ऑफिसला गेलो," असं दिक्षा म्हणाली.


मेलमध्ये काय लिहिलेलं?


"भारतीय संघाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव झाल्याचा धक्का आपल्या टीममधील अनेकांना बसला आहे. या कठीण प्रसंगामध्ये कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी कंपनी एका दिवसाची सुट्टी देत आहे. यामुळे सर्वांना एकत्र येण्यास आणि सावरण्यास मदत मिळे. आपण अधिक सक्षम होऊन कमबॅक करु," असं कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.



ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.