बडोदा : पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या एका महिन्यातचं त्याचं शालेय क्रिकेटमधील रेकॉर्ड तुटलं आहे. १४ वर्षांच्या प्रियांशु मोलियानं पृथ्वीचं रेकॉर्ड मोडलं. अंडर-१४ क्रिकेटच्या २ दिवसीय मॅचमध्ये प्रियांशुनं ५५६ रनची खेळी केली. पृथ्वी शॉनं ४ वर्षांपूर्वी अंडर-१६ क्रिकेट स्पर्धेत ५४६ रन केले होते. प्रियांशुनं दोन दिवसांच्या या मॅचमध्ये ६ तास बॅटिंग करून हा विक्रम केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडोदा क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या अंडर-१४ डीके गायकवाड स्पर्धेत मोहिंदर अमरनाथ क्रिकेट अॅकेडमीकडून खेळताना प्रियांशुनं ही खेळी केली. प्रियांशुनं योगी क्रिकेट क्लबविरुद्ध ३१९ बॉलमध्ये ५५६ रन केले. यामध्ये ९८ फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. प्रियांशुनं फक्त ५५६ रनच केले नाहीत तर योगी क्रिकेट क्लबच्या ६ विकेटही घेतल्या.


अमरनाथ अॅकेडमीनं ६९० रननी मॅच जिंकली


प्रियांशुच्या शानदार खेळीमुळे अमरनाथ अॅकेडमीनं ४ विकेट गमावून ८२६ रन केले. यानंतर बॅटिंगला आलेल्या योगी क्रिकेट क्लब पहिल्या इनिंगमध्ये ५२ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ८४ रनवर ऑल आऊट झाला. त्यामुळे अमरनाथ क्रिकेट अॅकेडमीचा ६९० रननी विजय झाला.


विराटसोबत खेळण्याचं स्वप्न


प्रियांशुला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन खेळाडू आवडतात. विराटसोबत क्रिकेट खेळण्याचं स्वप्न प्रियांशुनं बोलून दाखवलं आहे.


प्रियांशुसाठी कुटुंबानं राजकोट सोडलं


प्रियांशुच्या क्रिकेटसाठी त्याच्या कुटुंबानं राजकोट सोडलं आणि ते बडोद्यात आले. मागच्या ३ वर्षांपासून आम्ही बडोद्यात भाड्याच्या घरात राहत आहोत, असं प्रियांशुच्या वडिलांनी सांगितलं. प्रियांशुनं भारतासाठी क्रिकेट खेळावं हे आमचं स्वप्न आहे.