सुनील गावस्करांच्या भारतीय बॅट्समनना कानपिचक्या
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ५ विकेटनं विजय झाला.
लखनऊ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ५ विकेटनं विजय झाला. वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दमछाक झाली. ओशेन थॉमसच्या भेदक माऱ्यामुळे भारताला सुरुवातीला अडचणी आल्या. यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना कानपिचक्या दिल्या आहेत.
ओशेन थॉमसनं वेस्ट इंडिजच्या जुन्या फास्ट बॉलरची आठवण करून दिली. तर कार्लोस ब्रॅथवेटनं त्याच्या उंचीचा फायदा घेत उसळणारे बॉल टाकले यामुळे भारतीय बॅट्समनना बॅक फूटवर खेळणं भाग पडलं, असं गावस्कर म्हणाले.
जगातल्या इतर खेळाडूंप्रमाणेच भारतीय खेळाडूंच्या जोरात अंगावर येणाऱ्या बॉलची मर्यादा लक्षात येत आहे. ओव्हरमध्ये एकच बाऊन्सर आणि हेल्मेटच्या वापरामुळे बॅट्समनना शॉर्ट बॉल खेळता येत नाहीयेत, असं मत गावस्कर यांनी मांडलं.
२० ओव्हरच्या मॅचमध्ये एक बॉलर फक्त ४ ओव्हर टाकू शकतो. त्यामुळे ओशेन थॉमसला साथ द्यायला वेस्ट इंडिजकडे दुसरे बॉलर नव्हते, अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी दिली.
कोलकात्याच्या ईडन गार्डनची खेळपट्टी बॉलरना मदत करणारी होती. पण लखनऊची खेळपट्टी कशी असेल हे कोणालाच माहिती नाही. कारण या मैदानात पहिल्यांदाच मॅच होत आहे. त्यामुळे दोन्ही टीमचा कर्णधार टॉस हरणंच पसंत करेल, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं आहे.