क्रिकेटच्या जगतातील प्रसिद्ध समालोचकांचा जेव्हा कधी उल्लेख होते, तेव्हा त्यात एक भारतीय नाव नक्की असतं. हे नाव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर हर्षा भोगले यांचं आहे. हर्षा भोगले यांच्या करिअरला आज 40 वर्षं पूर्ण झाली आहेत. आपलं क्रिकेटचं ज्ञान, सखोल परीक्षण तसंच साधं राहणीमान अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग  आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 10 सप्टेंबर 1883 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात झाली होती. आपल्याला पहिला ब्रेक कधी मिळाला होता हेदेखील त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षा भोगले यांनी आपल्या इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) अकाऊंटवर दूरदर्शनकडून मिळालेलं निमंत्रण शेअर केलं आहे. यासह त्यांनी लिहिलं आहे की "आजपासून 4 दशकांपूर्वी (40 वर्षं) याच दिवशी मला माझा पहिला एकदिवसीय क्रिकेटचा अनुभव मिळाला होता. मला आजही तो तरुण लक्षात आहे, जो संधीच्या शोधात होता आणि डीडी-हैदराबादमधील एका निर्मात्याने त्याला ही संधी दिली होती". 


"सामन्याच्या आदल्या दिवशी मी एक साधं टी-शर्ट घालून रोलरवर बसलो होतो आणि सामन्यापूर्वीच्या गोष्टी करत होतो. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे दोन कॉमेंट्री स्टिंट्स होते. पुढील 14 महिन्यात मला आणखी दोन एकदिवीस सामने आणि एका कसोटी सामन्यात समालोचन करण्याची संधी मिळाली. यासाठी मी आभारी आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.



पहिल्यांदा समालोचन करण्यासाठी मिळाले होते इतके पैसे


हर्षा भोगले यांनी यासह पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मिळालेल्या मानधनाची पावतीही शेअर केली आहे. या पावतीवर वरती दूरदर्शन लिहिण्यात आलं असून, खाली मानधन म्हणून 350 रुपयांचा उल्लेख आहे. 


हा एकदिवसीय सामना भारत आणि पाकिस्तानदरम्यान 10 सप्टेंबर 1983 ला खेळवण्यात आला होता. दरम्यान, हर्षा भोगले यांच्या करिअरची 40 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मागील अनेक वर्षांमध्ये त्यांनी दर्जेदार समालोचन केलं असून, पुढील अनेक वर्षं ते यासाठी लक्षात राहतील. विराट कोहलीने मागील वर्षी पाकिस्तानविरोधातील टी-20 सामन्यात ऐतिहासिक खेळी केली होती. यावेळी हर्षा भोगले यांनीच समालोचन केलं होतं.