`टीम इंडिया`मध्ये या चायनीज कंपन्यांनी लावलाय पैसा
कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयचा कमाईचा सगळ्यात मोठा मार्ग असलेली आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयचा कमाईचा सगळ्यात मोठा मार्ग असलेली आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच आता बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीपुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधातली मोहीम आणखी आक्रमक झाली आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या बीसीसीआयमध्ये चीनच्या कंपन्यांनीच सर्वाधिक पैसा ओतला आहे.
आयपीएलमध्ये हजारो कोटी रुपये
जगातल्या सर्वोत्तम ५ क्रीडा स्पर्धांमध्ये आयपीएलचा समावेश होतो. याच आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क चीनची मोबाईल कंपनी विवो कडे आहेत. विवोने ५ वर्षांसाठी बीसीसीआयला २,२०० कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय ऑनलाईन फॅन्टसी लीग असलेल्या ड्रीम-११ आणि पेमेंट ऍप पेटीएमही आयपीएलच्या अधिकृत जाहिरातदारांपैकी आहेत.
ड्रीम-११ मध्ये जगातली सगळ्यात मोठी व्हिडिओ गेमिंग कंपनीपैकी एक चीनी कंपनी टेनसेंटची मोठी हिस्सेदारी आहे. तर पेटीएममध्ये चीनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाची ३७.१५ टक्के भागिदारी आहे. आयपीएलचे असोसिएट स्पॉन्सर असलेल्या स्विगीमध्येही टेनसेंटची ५.२७ टक्क्यांची भागिदारी आहे.
टीम इंडियालाही मिळतोय पैसा
भारतीय टीमला ५ वर्षांसाठी स्पॉन्सर करण्यासाठी ऑनलाईन स्टडी ऍप बायजूसने बीसीसीआयला १,०७९ कोटी रुपये दिले आहेत. बायजूसमध्येही टेनसेंटची हिस्सेदारी आहे. याशिवाय पेटीएम बीसीसीआयला प्रत्येक मॅचमध्ये स्पॉन्सरिंगचे ३.८ कोटी रुपये देते. ड्रीम-११देखील बीसीसीआयचा अधिकृत स्पॉन्सर आहे.
बीसीसीआयमध्ये चीनी कंपन्यांनी लावलेल्या पैशांबद्दल खजिनदार अरुण सिंग धुमळ यांना विचारण्यात आलं. सरकारकडून आम्हाला चीनी कंपन्यांना रोखण्याचे कोणतेही निर्देश आलेले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
आयओएच्या घोषणेमुळे बीसीसीआयवर दबाव
भारतीय ऑलिम्पिक संघ (आयओए)च्या घोषणेमुळे बीसीसीआयवर दबाव आला आहे. भारतीय ऑलिम्पिक दलाचे स्पॉन्सर असलेली चीनी बॅडमिंटन निर्माता कंपनी ली निंगसोबतचा करार संपवण्यात येणार आहे. देश सगळ्यात पहिले आहे, स्पॉन्सर नंतर शोधता येऊ शकतो, असं आयओएचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितलं.