2025 ICC Champions Trophy Pakistan: भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानचा दौऱ्या करण्याची शक्यता फारच धुसर असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीकडून पाकिस्तानऐवजी अन्य दोन देशांचा पर्याय अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीसमोर ठेवला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.


पाकिस्तानकडे यजमानपद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये चॅम्पियन्स चषक स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यासाठी बार्बाडोसच्या मैदानामध्ये हजेरी लावण्याआधी आयसीसीच्या अधिकाऱ्यांना या स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक दाखवलं होतं. यामध्ये भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणास्तव लाहोरमध्येच खेळवले जातील असं नियोजन केलं आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संघाला पाकिस्तानला पाठवण्यास तयार नसल्याचं कळतं. भारतीय संघाने यापूर्वी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. भारताची हीच भूमिका अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे. 


नक्की वाचा >> 'टेन्शन घेऊ नका! भारतीय संघ पाकिस्तानी दौऱ्यावर नाही आला तर...'; जय शाहांचं नाव घेत इशारा


भारत देणार हे पर्याय


बीसीसीआयकडून चॅम्पियन्स ट्रॉफी चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये संघ पाठवण्याला विरोध असतानाच या स्पर्धेतील भारताचे सामने दुसऱ्या देशात खेळवले जावे असा पर्याय दिला जाऊ शकतो. भारताकडून यासाठी त्रयस्त ठिकाण म्हणून दुबई किंवा श्रीलंकेचा पर्याय सुचवला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. यापूर्वी आशिया चषक स्पर्धा 2023 मध्ये भारताने अशीच भूमिका घेतली होती. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते. मात्र या सामन्यांमध्ये अनेकदा पावसाचा व्यत्यय आला होता. 


नक्की वाचा >> 'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबरला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'


भारताने यापूर्वी 16 वर्षांपूर्वी केलेला पाकिस्तानचा दौरा


यापूर्वी भारतीय संघाने 2008 साली पाकिस्तानचा दौरा केला होता. 2008 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता. मात्र 2023 साली भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. 2023 च्या आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडे असताना भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे हे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तरित्या विभागून देण्यात आलं. आशियाई क्रिकेट समितीने संयुक्तरित्या श्रीलंकेत आणि पाकिस्तानात ही स्पर्धा भरवत भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील याची काळजी घेतली होती. 


नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'


संभाव्य सामना कधी?


पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने चॅपियन्स ट्रॉफी 2025 चं कच्चं वेळापत्रक तयार केलं आहे. हे वेळापत्रक आयसीसीला सोपवण्यात आलं आहे. यावेळेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी 1 मार्च रोजी भारताविरुद्ध आपल्या संघाला मैदानात उतरवण्याचं नियोजन केलं आहे. मात्र यामधील सर्वात मोठी गोम ही आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अद्याप सहमती दर्शवलेली नाही. तसेच भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यासंदर्भातही अद्याप होकार दिलेला नाही. मात्र पासीबीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जातील. तर 10 मार्च हा राखीव दिवस आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार असेल तर 19 फेब्रवारी 2025 आधी भारतीय संघाला रवाना व्हावं लागेल.