2025 Champions Trophy India Tour Pakistan: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान भटने भारतीय संघाचा उल्लेख करत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला म्हणजेच पीसीबीला सल्ला दिला आहे. पीसीबीने आगामी 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या उपलब्धतेसंदर्भात फारशी चिंता करु नये असं सलमानने म्हटलं आहे. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघ उपस्थिती दर्शवतील याची काळजी घेण्याची गरज आहे, असं सलमानने म्हटलं आहे.
पाकिस्तानमध्ये संघाला न पाठवण्याच्या भारताच्या भूमिकेवर आयसीसी काय भूमिका घेते यावरुन ते खरोखरच किती निष्पक्षपणे काम करता हे दिसून येईल, असंही सलमानने म्हटलं आहे. एका युट्यूब चॅनेलवर बोलताना सलमानने हे विधान केलं आहे. "ते (भारतीय संघ) आले तर त्यांचं स्वागत केलं जावं. ते नाही आले तर तो आयसीसीचा प्रश्न आहे की त्यांनी हे प्रकरण कसं हाताळावं. इतर देशांना ज्याप्रमाणे वागणूक दिली जाते तशीच वागणूक आयसीसी भारताला देते का हे यावेळेस समजेल. नियंत्रक म्हणून ते (आयसीसी) किती अधिकार गाजवू शकतात हे दिसून येईल. तसेच ते किती निष्पक्षपणे काम करु शकतात हे सुद्धा यातून दिसेल," असं सलमान भटने म्हटलं आहे.
यापूर्वी भारतीय संघाने 2008 साली पाकिस्तानचा दौरा केला होता. 2008 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता. मात्र 2023 साली भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. 2023 च्या आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडे असताना भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे हे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तरित्या विभागून देण्यात आलं. आशियाई क्रिकेट समितीने संयुक्तरित्या श्रीलंकेत आणि पाकिस्तानात ही स्पर्धा भरवत भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील याची काळजी घेतली होती.
नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'
बीसीसीआयचे सचीव जय शाह हे पाकिस्तानमध्ये भारतीय़ संघाला पाठवण्यासंदर्भात काही संकेत देतील असं आपल्याला वाटत नसल्याचं सलमान भटने म्हटलं आहे. जय शाह यांनी 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होईल असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सलमान भटने, "यामुळे पाकिस्तानने आनंदी होण्याची काही गरज नाही. कारण शाह यांनी कधीच त्यांचा संघ पाकिस्तानी दौऱ्यावर येईल असं म्हटलेलं नाही," असं म्हटलं.
भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावसंदर्भातील अडचण आयसीसीने सोडावयला हवी हा आपला युक्तीवाद मांडताना सलमान भटने, "आपण सारं काही सेन्सेश्नलाइज करतोय. जय शाह यांनी पाकिस्तानी दौऱ्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याच्या बातम्या समोर आल्यात. मात्र मला वाटत नाही की त्यांनी काही संकेत दिलेत. त्यांनी तसे संकेत दिले असले तरी मी यासंदर्भात फार उत्साही नाही. कारण हे आयसीसीचं काम आहे की सर्व संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये यावेत," असं म्हटलं.
नक्की वाचा >> 'वानखेडेबाहेर हाथरससारखी चेंगराचेंगरी झाली असती; देवाचे आभार मानले पाहिजेत की मुंबईत..'
"मागील वर्षी भारतात वर्ल्ड कप स्पर्धा होती तेव्हा जोपर्यंत भारत चॅम्पियन्स चषकासाठी पाकिस्तानमध्ये येण्यास मान्यता देत नाही तोपर्यंत पाकिस्तानी संघ भारतात जाणार नाही असं म्हटलं गेलं. तेव्हा भारतीय प्रसारमाध्यमांनी ही आयसीसीची स्पर्धा असल्याचं वार्तांकन केलं. तिच भूमिका आपणही घेतली पाहिजे. मला नाही वाटत की आपण याची फार चिंता केली पाहिजे," असं सलमान भटने स्पष्टपणे सांगितलं.
"कोणता संघ येणार आणि कोणता नाही याची चिंता पाकिस्तानने करता कामा नये. त्याऐवजी पाकिस्तानने ही स्पर्धा यशस्वी कशी होईल आणि स्पर्धेची ठिकाणी, सर्व सुविधा उत्तम कशा असतील याची काळजी केली पाहिजे. सुरक्षेची काळजी केली पाहिजे. या गोष्टींसंदर्भात कोणतीही समस्या निर्माण होता कामा नये. उत्तम सुविधा देत असल्याने मागील काही वर्षात वेगवेगळे संघ आपल्या देशात येत आहेत. भारताने काही वेगळा विचार केला तर त्याची चिंता आयसीसीने केली पाहिजे आपण नाही," असं सलमान भट म्हणाला.