...आणि नागपूरच्या जामठा मैदानावरील ते रेकॉर्ड कायम राहिलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धची या मैदानावरील भारताची आजची चौथी मॅच आहे.
नागपूर : विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये शानदार शतक लगावले. भारतीय टीम संकटात असताना कोहलीने एकतर्फी खिंड लढवली. त्याने ११६ रन केल्या. विराटच्या या खेळीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५१ रनचे आव्हान दिले. या शतकी कामगिरीसोबत विराट कोहलीने नागपूरच्या जामठा मैदानावरील भारतीय टीमचा एक विक्रम कायम ठेवला आहे.
भारतीय टीम जेव्हा या मैदानावर खेळली आहे, तेव्हा भारताकडून किमान एकातरी खेळाडूने शतक लगावले आहे. भारत आतापर्यंत नागपूरच्या या मैदानावर एकूण पाच मॅच खेळली आहे. तर आजची सहावी मॅच आहे. या सहा मॅचपैकी तीन मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाल्या आहेत. तर भारत उर्वरित दोन मॅच श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत खेळला आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. भारतीय टीमने याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची या मैदानावरील भारताची आजची चौथी मॅच आहे.
नागपुरच्या जामठा मैदानावरील मॅच
१) भारताने नागपूरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली मॅच २००९ साली खेळली होती. या मॅचमध्ये धोनीने १२४ रनची शतकी खेळी केली होती. या मॅचमध्ये भारताचा ९९ रननी विजय झाला होता.
२) भारतीय टीमने या मैदानावर दुसरी मॅच श्रीलंकेविरुद्ध २००९ साली डिसेंबर महिन्यात खेळली. या मॅचमध्ये धोनीने शतकं ठोकलं होतं. धोनीने यावेळी १०७ रन केल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता.
३) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०११ वर्ल्ड कपमध्ये या मैदानावर भारतानं मॅच खेळली गेली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने १११ रन्स केले होते. पण अटीतटीच्या या मॅचमध्ये भारताचा ३ विकेटने पराभव झाला होता.
४) २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध या मैदानावर भारताने सहा विकेटने विजय मिळवला होता. भारताकडून या मॅचमध्ये शिखर धवन आणि विराट कोहली या दोघांनी शतक ठोकलं होतं. धवनने १०० तर विराटने ११५ रन केल्या होत्या. याच प्रत्युतरादाखल ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन आणि जॉर्ज बेली या दोघांनी शतक लगावलं होतं.
५) भारत-ऑस्ट्रेलिया २०१७ ला परत एकदा या मैदानात खेळले होते. या मॅचमध्ये रोहित शर्माने १२५ रनची कामगिरी केली होती. भारताकडून या मैदानावरील आतापर्यंतची ही सर्वाधिक मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे. भारताने या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा ७ विकेटने पराभव केला होता.
६) या मैदानावर सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड देखील भारताच्या नावे आहे. भारताने २००९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७ विकेटच्या मोबदल्यात ३५४ रन केल्या होत्या. विशेष म्हणजे या मैदानावर भारताकडून सहा शतकं लगावली आहेत. महेंद्रसिंह धोनीने या मैदानावर ५ मॅचमध्ये सर्वाधिक २६८ रन काढल्या आहेत.