अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 संघात पुनरागमन केलं आहे. यासह त्यांनी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यात एकही धाव करु शकला नव्हता. दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात सर्वांचं लक्ष त्याच्यावर होतं. अखेर तिसऱ्या सामन्यात रोहितने शतक ठोकत टीकाकारांना उत्तर दिलं. दुसरीकडे विराटने दुसऱ्या सामन्यात 16 चेंडूत 29 धावा ठोकल्या होत्या. पण तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. विराट कोहलीच्या खेळीने चाहते नाराज झाले असले तरी कर्णधार रोहित शर्माने मात्र त्याचा हेतू चांगला होता हे स्पष्ट करत पाठराखण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर रोहित शर्माने समालोचकांशी संवाद साधला. यावेळी त्याने विराट कोहली आणि संजू सॅमसन शून्यावर बाद झाले असले तरी त्यांचा हेतू महत्त्वाचा होता असं सांगितलं आहे. 


"आम्हाला खेळाडूंना संघातील त्यांचं स्थान आणि त्यांनी ज्या पद्दतीचं क्रिकेट खेळणं अपेक्षित आहे याबद्दल स्पष्टता द्यायची होती. खेळाडू जेव्हा मैदानात येतात तेव्हा त्यांना काय अपेक्षित आहे हे माहित आहे. जसं की आज तुम्ही पाहिलं असेल विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासून आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. तो सहसा असं करत नाही, परंतु त्याने त्याचा हेतू दर्शविला. सॅमसनच्या बाबतीतही तसंच आहे. तो पहिल्या चेंडूवर बाद झाला असला तरी हेतू स्पष्ट होता," असं रोहितने जिओ सिनेमावरील चॅटमध्ये सांगितले.


दरम्यान रोहित शर्माला यावेळी वर्ल्डकपमधील प्रवास आणि अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर रोहितने 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे असं स्पष्ट करताना आता टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा प्रयत्न असेल असं सांगितलं. 


रोहितने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "मला खरंतर आता त्याबद्दल फार विचार करायचा नाही. 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. याचा अर्थ मी टी-20 वर्ल्डकप आणि कसोटी चॅम्पिअनशिपला कमी लेखतोय असं नाही. पण मी लहानपणापासून 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप पाहत मोठा झालो आहे. त्यात जेव्हा तो भारतात होत असतो तेव्हा उत्साह शिगेला असतो. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्ही जिंकू शकलो नाही. संपूर्ण संघ नाराज होता. मला खात्री आहे की, लोकही नाराज होते. पण आता टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. आणि आम्ही तो जिंकू अशी आशा आहे".