...म्हणून आर्मीची कॅप घालून मैदानात उतरली भारतीय टीम
धोनीच्या हस्ते भारतीय खेळाडूंना आर्मी कॅप
रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तीसरा वनडे सामना रंगत आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये भारत 2-0 ने पुढे आहे. होमग्राऊंड रांची मध्ये हा सामना होत असल्याने धोनीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. भारताने तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2 सामने जिंकले आहेत. भारताने या सामन्यात कोणताच बदल केलेला नाही.
विशेष म्हणजे आज आर्मी कॅम्प घालून टीम इंडिया मैदानात उतरली आहे. महेंद्र सिंह धोनीने सगळ्या खेळाडूंना आर्मीची कॅप दिली. टॉसच्या वेळी देखील विराटने आर्मी कॅप घातली होती. टॉसच्या वेळी भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी खेळाडू डायना इडुल्जीने महिला दिनाच्या निमित्ताने मॅच रेफरी म्हणून टॉस दिला. भारतीय टीम या सामन्यातून शहीद भारतीय जवानांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआयने ही मोहिम सुरु केली असून दरवर्षी एक सामना हा आर्मीची कॅप घालून खेळण्यात येईल. या सामन्यातून मिळणारी फी खेळाडू पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहेत.
आज धोनी आपल्या होम ग्राऊंडमध्ये खेळणार आहे. धोनीने जर वर्ल्डकप नंतर निवृत्तीची घोषणा केली तर आजची वनडे ही धोनीची होमग्राऊंडमधील शेवटची वनडे असेल. याआधी टीम इंडियाने हैदराबाद आणि नागपूर वनडे जिंकली आहे. टीम इंडिया रांची वनडेमध्ये विजयासह सिरीजही जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.