खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या Ajinkya rahane साठी मोठी बातमी; टी-20 वर्ल्डकपपूर्वी मिळणार गूड न्यूज
नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत अजिंक्य रहाणेला टीममध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं.
मुंबई : भारतीय कसोटी टीमचा वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा बाप होणार आहे. त्याची पत्नी राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा पती अजिंक्य रहाणे आणि मुलीसोबत दिसतेय. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत अजिंक्य रहाणेला टीममध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं.
2014 मध्ये अजिंक्य रहाणे आणि राधिका विवाहबंधनात अडकलं. लग्नाच्या पाच वर्षानंतर राधिकाने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजिंक्य आणि राधिकाच्या घरात चिमुकली पावलं धावणार आहेत.
राधिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, ऑक्टोबर 2022 तसंच तिने बेबी आणि हृदयाचे इमोजी शेअर केले. त्यांच्या या पोस्टबद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं.
यावेळी जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनीही त्याचे अभिनंदन केलं. आतापर्यंत या पोस्टला अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण त्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत गेली, दरम्यानच्या काळात त्याला अनेक संधी मिळाल्या पण त्याचा फायदा उठवण्यात तो अपयशी ठरला.
दरम्यान टीम मॅनेजमेंटने आधी त्याच्याकडून उपकर्णधार हिसकावून घेतलं आणि नंतर टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे, त्यामुळे तो कधीही निवृत्त होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जातेय.