भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये नसून, भारतीय संघातील जागा आता जवळपास गमावल्यात जमा आहे. दुसरीकडे आयपीएलमधील त्याची जागाही संपुष्टात आली आहे. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. पृथ्वी शॉने 9 नोव्हेंबरला आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. टीव्ही इंडस्ट्रीतील आपल्या मित्रांसह त्याने वाढदिवस साजरा केला. यादरम्यान बेधुंदपणे नाचतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी व्यक्त होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या 28 संभाव्य खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉचं नाव आहे. यामुळेही पृथ्वी शॉसाठी वाढदिवास आणखी खास झाला होता. 28 खेळाडूंच्या यादीत शॉचा समावेश नव्याने झाला आहे. यानिमित्ताने पृथ्वी शॉला जीवनदानच मिळालं आहे. खरं तर सोशल मीडियावर पृथ्वी शॉच्या टी-20 मधील कमबॅकवर चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी सोशल मीडियावर भलताच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  


व्हायरल व्हिडीओत पृथ्वी शॉ नाचताना आणि पार्टी करताना दिसत आहे. पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. 



एक्सवर हा व्हिडीओ शेअर करताना एका युजरने लिहिलं आहे की, 'लारा, सचिन, सेहवाग फक्त विचार करु शकतात असं आयुष्य पृथ्वी शॉ जगत आहे'. यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.



एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, तो लारा, सचिन किंवा सेहवाग आहे का माहिती नाही पण शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर आणि प्रेम चोप्रा आहे. 



एकाने सचिनपासून कांबळीपर्यंतचा प्रवास असा टोला लगावला आहे. 


सहा वर्षांपूर्वी भारतीय संघात पदार्पण केल्यापासून पृथ्वी शॉने पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. फिटनेस आणि शिस्तभंगाच्या बाबींमुळे त्रिपुराविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबई संघातून वगळण्यात आलं. तो नियमितपणे मुंबईच्या प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहत नव्हता आणि वजनही वाढलं होतं. ज्यामुळे निवडकर्त्यांनी इतर पर्याय चाचपडले आणि त्यांची निवड केली. 


"तुम्हाला फिटनेसकडे आणि मैदानातील धावण्यावर लक्ष द्यावं लागतं. मुंबई क्रिकेट असोसिशनचा मोठा इतिहास असून, कोणत्याही खेळाडूसाठी तडजोड केली जाणार नाही," असं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना सांगितलं. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये मुंबई आणि ओडिशा यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ फिटनेस ड्रिलमधून जात होता.