अर्जुनला सचिनने दिला `हा` कानमंत्र, युवा खेळाडूंसाठीही ठरणार फायद्याचा
अर्जुनही टप्प्या टप्प्याने त्याच्या कारकिर्दीत यश संपादन करत आहे
मुंबई : क्रीडा विश्वात सध्या अनेक युवा खेळाडू त्यांची नवी ओळख प्रस्थापित करू पाहात आहेत. अशा खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकर हे नावही अनेकांचं लक्ष वेधत आहे. अर्जुनही टप्प्या टप्प्याने त्याच्या कारकिर्दीत यश संपादन करत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे एक प्रकारचं दडपण आणि अपेक्षांचं ओझं त्याच्यावर नेहमीच असतं. पण, त्यातही तो स्वत:ची ओळख प्रस्थापित करत वेगळेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. यात त्याला महत्त्वाची मदत आणि सल्ला मिळतोय तो म्हणजे खुद्द त्याच्या वडिलांचा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा.
टी२० मुंबईच्या दुसऱ्या सत्रात खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. या सत्राच्या लिलावाच्या दिवशीही तो उपस्थित राहणार आहे. वरिष्ठ वर्गात खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असणार आहे. अर्जुनला मिळालेल्या याच संधीविषयी जेव्हा सचिनला विचारण्यात आलं तेव्हा त्याने ही संधीच मुळात त्याच्यासाठी महत्त्वाची असून, अर्जुनने तिचं सोनं करावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
'खेळामध्ये कोणत्याची गोष्टीची हमी देता येत नाही. तुम्हाला जितक्या संधी मिळतात त्या संधी घेत स्वत:ला सिद्ध करत सर्वोत्तम कामगिरी करणंच अशा वेळी अपेक्षित असतं', असा कानमंत्र त्याने एका मुलाखतीच्या माध्यमातून अर्जुनला दिला. ही एक अशी संधी आहे, जिथे इतर लोकं तुमचं अनुकरण करतील, तुमच्या कामगिरीतून आदर्श घेतील. त्यातही तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करत राहिलात तर, एक दिवस यशाच्या शिखरावर असाल, असं म्हणत त्याने एखाद्या क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता किती महत्त्वाची असते हे पटवून दिलं.
यशाची वाट चालत असतानाच अर्जुनच्या वाट्याला अपयश आल्यास त्याने परिस्थिती कशी हाताळावी यासाठीचाही सल्ला त्याने दिला. 'त्याला अपयश मिळालं तरी काहीच हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीसाठी दुसरा दिवस उजाडतो. तो पुनरागमन नक्कीत करु शकतो', असं सचिन म्हणाला. कारकिर्दीत चढ-उतार येतच राहतात, पण दररोज उठून एका नव्या प्रेरणेणे स्वप्नांचा पाठलाग करणंही तितकच महत्त्वाचं असल्याचा मोलाचा सल्ला त्याने दिला. सचिनचा हा सल्ला फक्त अर्जुनच नव्हे, तर येत्या काळात क्रिकेट किंवा इतरही क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या नव्या पिढीसाठीही फायद्याचा आहे, असं म्हणायला हरकत नाही.