#HappyFriendshipDay2019 : ...म्हणून सचिन म्हणतोय, `कांबळ्याssss`
पाहा त्यांच्यातील हा संवाद
मुंबई : मैत्री... आयुष्याच्या या प्रवासात आणि लांबच लांब जाणाऱ्या वाटेवर येणारं एक असं वळण जे प्रत्येकाला हवहवसं आणि तितकंच महत्त्वाचं असतं. अर्थात प्रत्येकासाठी मैत्रीची संकल्पना ही वेगळी असते. पण, अखेर मैत्री ही मैत्रीच असते. अशाच या सुरेख नात्याला आणखी दृढ बनवणारा आजचा दिवस. जगभरात 'फ्रेंडशिप डे' अर्थात मैत्री साजरा करण्याच्या या दिवसाची धूम पाहायला मिळत आहे.
कला विश्वापासून क्रीडा जगतापर्यंतही याचेच पडसाद पाहायला मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्याच्या जीवनातील एका खास मित्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सचिनचा हा मित्र म्हणजे विनोद कांबळी.
शालेय दिवसांपासूनच एकमेकांच्या साथीने कारकिर्द गाजवणारे हे दोन मित्र फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सोशल मीडिया गाजवत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण, खुद्द सचिनने त्याच्या सोशल मीडियावर विनोद कांबळीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला तितक्य़ाच आपलेपणाने सादही घातली आहे.
'कांबळ्याsss...', असा उल्लेख करत सचिनने विनोद कांबळीला या फोटोची आठवण करुन दिली. त्याचा हा अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. सचिनने शेअर केलेल्या या फोटोविषयी विनोद कांबळीने एक आठवण सांगितली. 'हा तोच सामना होता ज्यावेळी क्रिकेटचा सामना सुरु असचाना खेळपट्टीवर एक पतंग उडत आला होता. ज्यानंतर तो पकडून मी लगेचच तो उडवण्यास सुरुवात केली. हे पाहून आचरेकर सर माझ्या दिशेने आले. हे तू सुद्धा पाहिलंस पण, मला सांगितलं नाही... पुढे काय झालं हे आपण जाणतोच....', असं त्याने लिहिलं.
विनोद कांबळीच्या या ट्विटला उत्तर देत, 'कसा विसरु शकतो... ' असं सचिनने लिहिलं. सोबतच पुन्हा एकदा त्याच दिवसांच्या आठवणी जागवण्यासाठी एके दिवशी भेटण्याचा बेत आखण्याची विनंतीही केली. बालपमीच्या मित्रांचा हा मराठमोळा संवाद नेटकऱ्यांच्या 'फ्रेंडशिप डे'ला खऱ्या अर्थाने 'चार चाँद' लावून गेला, असं म्हणायला हरकत नाही.