Shikhar Dhawan Instagram Post: भारतीय क्रिकेटर संघाचा फलंदाज शिखर धवन सध्या मैदानाबाहेरील आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. खासगी आयुष्यात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या भारतीय संघात त्याला जागा देण्यात आली नसली, तरी आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा तो कर्णधार आहे. पण शिखर धवनसमोर क्रिकेटपेक्षाही खासगी आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. शिखर धवनने आपली पत्नी आयेशा मुखर्जीपासून काडीमोड घेतला आहे. पण या संघर्षात त्याला गेल्या एका वर्षापासून आपल्या मुलापासून दूर राहावं लागलं आहे. शिखर धवनने इंस्टाग्रामला एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने आपल्याला सर्व व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्यात आल्याने मुलाला पाहणंही शक्य होत नसल्याचा दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात दिल्ली कोर्टाने शिखर धवनला पत्नी आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली. क्रूरतेच्या आधारावर कोर्टाने शिखर धवनचा घटस्फोट मंजूर केला.


कोर्टाने निकाल देताना आयेशाने शिखर धवनला मानसिक क्रूरतेचा बळी पाडल्याचं मान्य केलं. कोर्टाने यावेळी मुलाचा ताबा देण्यासंबंधी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. पण शिखर धवनला भारत आणि ऑस्ट्रेलियात आपल्या मुलाला भेटण्यासाठी योग्य वेळ देण्याचा तसंच व्हिडीओ कॉलवर संवाद साधण्याचा अधिकार दिला. याशिवाय आयशा मुखर्जीला शाळेच्या सुट्ट्यांदरम्यान मुलाची भेट होण्यासाठी त्याला भारतात शिखर धवनच्या घरी आणण्याचाही आदेश दिला. पण यानंतरही शिखर धवनला मुलाला भेटणं शक्य होत नसल्याचं दिसत आहे.


मुलापासून लांब ठेवलं, पैसे उकळले; धवनचे पत्नीवर गंभीर आरोप; कोर्ट म्हणालं 'ही इतकी क्रूरता...'


 


शिखर धवनने इंस्टाग्रामला भावूक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "मी तुझी वैयक्तिक भेट घेऊन आता वर्ष झालं आहे. त्यात मागील तीन महिन्यांपासून मला प्रत्येक ठिकाणावर ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यामुळे मी हा फोटो पोस्ट करत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे माझ्या बाळा".



 


"मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरीही, मी तुमच्याशी मनाने जोडला जातो. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की तू फार चांगल्या रितीने वाढत आहेस", असंही त्याने म्हटलं आहे.


पुढे त्याने लिहिलं आहे की, "बाबा तुझी नेहमीच आठवण काढतो, आणि तुझ्यावर फार प्रेम करतो. तो नेहमीच सकारात्मक असतो. देवाच्या कृपने आपली भेट होईल त्या दिवसाची मी चेहऱ्यावर हास्य ठेवून वाट पाहत आहे. खोडकर हो पण विध्वंसक नाही, देणारा हो, नम्र, दयाळू, सहनशील आणि बलवान हो".


"तुला पाहिलं नसतानाही मी तुला रोज मेसेज लिहितो. तुझी तब्येत, नियमित आयुष्य याबद्दल विचारत असतो. तसंच मी काय करत आहे. आयुष्यात नवं काय आहे हे शेअर करत असतो," असंही लिहिलं आहे.