Shikhar Dhawan Divorce with Wife Ayesha Mukherjee: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शिखऱ धवनचा अखेर घटस्फोट झाला आहे. कोर्टाने शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. दिल्लीमधील पटियाला हाऊस परिसरातील कौटुंबिक न्यायालयाने ही मंजुरी दिली. यावेळी कोर्टाने मान्य केलं की, पत्नी आयशाने ऑस्ट्रेलियात वास्तव्य करत शिखर धवनला आपल्या एकुत्या एक मुलापासून कित्येक वर्षं दूर ठेवत मानसिक त्रास दिला.
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हरिश कुमार यांनी शिखर धवनने पत्नी आयशावर केलेले सर्व आरोप मान्य केले. आयशा मुखर्जी आपल्यावरील आरोपांना विरोध केला नसू, ते खोटे आहेत हे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचं कोर्टाने सांगितलं.
शिखर धवनने कोर्टात दावा केला होता की, माझ्या करिअरमुळे मला ऑस्ट्रेलियात जाऊन वास्तव्य करणं शक्य नसल्याने पत्नीने भारतात येऊन माझ्यासह वास्तव्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण नंतर अचानक आयशाने माघार घेतली आणि ऑस्ट्रेलियात राहण्याचं ठरवलं. जर आपण भारतात आलो तर आपल्या दोन्ही मुलींचा ताबा पहिल्या पतीकडे जाईल याची भीती तिला वाटत होती.
"स्वत:चा कोणताही दोष नसताना धनव वर्षानुवर्षं स्वत:च्या मुलापासून वेगळे राहण्याच्या यातना आणि वेदना सहन करत होता. त्याच्या पत्नीने कोणतेही आरोप फेटाळले नसून, आपण खरंच भारतात येऊन राहणार होतो असा दावा केला आहे. पण तरीही तिने दावा फेटाळलेला नाही. प्रतिवादीच्या या वागण्याने इतकी क्रूरता, यातना आणि आघात सहन करावा लागला आहे की, याचिकाकर्त्याला आपलं लग्न वाचवणं अशक्य होतं," असं कोर्टाने म्हटलं आहे.
शिखर धवनने केलेल्या आरोपात म्हटलं आहे की, पत्नी आयशाने त्याला ऑस्ट्रेलियातील आपल्या मालकीच्या तिन्ही संपत्ती तिच्या नावावर करण्यास भाग पाडलं. यामधील एका संपत्तीची ती 99 टक्के मालकीण असून, इतर दोन संपत्तीत भागीदार आहे. कोर्टाने निर्णय देताना आयशा हे आरोप खोटे असलयाचं सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं.
"आयशा मुखर्जीने ही संपत्ती आपल्या पैशांनी विकत घेतली आहे आणि तिचं नाव प्रेमापोटी त्यात सहभागी झालं आहे हे सिद्ध करणं गरजेचं होतं. पण ते सिद्ध होऊ न शकल्याने शिखर धवनने तिने बळजबरीने संपत्ती नावावर केल्याच्या आरोपावर विश्वास ठेवत आहोत," असं कोर्टाने म्हटलं.
कोर्टाने धवनचा हा आरोपही स्वीकारला की, आयशाने तिला केवळ त्याच्या मुलासाठीच नव्हे तर तिच्या दोन मुलींचा खर्च देण्यासही भाग पाडलं. पहिल्या पतीपासून असणाऱ्या दोन्ही मुलींसाठी तिला आधीच खर्च मिळत असतानाही तिने माझ्याकडून पैसे घेतले.
कोर्टाने निकाल देताना आयशाने शिखर धवनला मानसिक क्रूरतेचा बळी पाडल्याचं मान्य केलं. कोर्टाने यावेळी मुलाचा ताबा देण्यासंबंधी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. पण शिखर धवनला भारत आणि ऑस्ट्रेलियात आपल्या मुलाला भेटण्यासाठी योग्य वेळ देण्याचा तसंच व्हिडीओ कॉलवर संवाद साधण्याचा अधिकार दिला आहे. याशिवाय आयशा मुखर्जीला शाळेच्या सुट्ट्यांदरम्यान मुलाची भेट होण्यासाठी त्याला भारतात शिखर धवनच्या घरी आणण्याचाही आदेश दिला आहे.
शिखर धवनने आयशाला हरभजन सिंगच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये पाहिलं होतं. आयशाचा फोटो पाहताच शिखर धवन तिच्यावर फिदा झाला होता. यानंतर शिखरने आयशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणं झालं होतं आणि प्रेमात रुपांतर झालं होतं. शिखर धवन आयशापेक्षा वयाने 10 वर्षं छोटा आहे.
2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. हे शिखर धवनचं पहिलं लग्न होतं. तर आयशाचं दुसरं लग्न होतं. आयशाचं पहिलं लग्न ऑस्ट्रेलियाच्या एका उद्योजकाशी झालं होतं. पण हे लग्न टिकलं नव्हतं. आयशाला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. त्यांचं नाव रेया आणि आलिया आहे. शिखर आणि आयशाला एक मुलगा असून, त्याचं नाव जोरावर आहे.