मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत संघाला उल्लेखनीय स्थानावर ठेवलं आहे. मुख्य म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराटने संघातील प्रत्येक खेळाडूला अपेक्षित वाव देत, त्याचा फायदा संघाला करुन घेतला. असं असलं तरीही २०१९ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकामध्ये मात्र विराट सेनेला हार पत्करावी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामन्यात अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. परिणामी या स्पर्धेतूनच संघ बाहेर पडला आणि विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. या साऱ्याविषयी विराट कोहलीने एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. 


'टाईम्स नाऊ'च्या वृत्तानुसार विश्वचषक स्पर्धेत पराभवाविषयी वक्तव्य करत विराट म्हणाला, 'मला विश्वास होता की मी संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी अखेरपर्यंत खेळत राहीन. मला स्वत:वर इतका विश्वास होता की मी बाद न होता खेळत राहीन. पण, बहुधा हा माझ्या अंतर्मनाता अहंकार होता.' आपल्या अंतर्गमातील याच अहंकारामुळे पराभवचा सामना करावा लागल्याची बाब आजही विराटच्या मनात घर करुन आहे. 



असा झाला होता सामना.... 


न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये ५० षटकांमध्ये या संघाने ८ गडी बाद २३९ धावा केल्या होत्या. विरोधी संघाने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला २९.३ षटकांमध्ये अवघ्या २२१ धावाच करता आल्या. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी. जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी संघाला विजयाची आशा दिली, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. विराट या सामन्यात अवघ्या एका धावेवर बाद झाला होता. ज्यामुळे क्रीडारसिकांची निराशा झाली होती.