विराटचा सध्याचा खेळ पाहून एबीडी म्हणतो...
विराट आणि आपल्यामध्ये साम्य असणारे काही मुद्देही त्याने मांडले.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणाऱ्या क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खेळावर आणि एकंदर क्रीडाविश्वात असणाऱ्या त्याच्या वावरावर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. व्यक्तीमत्व आणि मानसिक कणखरपणा या दोन गोष्टी विराटला सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या प्रकारातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबीडी येत्या काळात इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएलच्या नव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) या संघाकडून खेळणार आहे.
'गेल्या काही काळापासून विराटचा खेळ आणि त्याचं एकंदर प्रदर्शन पाहता तो इतक्यावरच थांबणाऱ्यांपैकी दिसत नाही', असं एबीडी म्हणाला. आपण त्याच्यासोबत गेल्या सहा वर्षांपासून खेळत असल्याचं म्हणत त्याच्या कामगिरीला कशाचीही तोड नसल्याचं डिविलियर्सने स्पोर्ट्स २४ शी संवाद साधताना स्पष्ट केलं.
विराट हा एक खेळाडू असण्यासोबतच तो एक व्यक्तीही आहे. त्यामुळे सहाजिकच कारकिर्दीत कठिण प्रसंगांचा त्यालाही सामना करावा लागत असल्याची बात एबीडीने यावेळी समोर ठेवली. अनेकदा जिथून सुरुवात केली तिथेच परत जाऊन पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे असंख्य प्रसंग उदभवतात, पण अशा वेळी विराटचं व्यक्तीमत्वं आणि त्याचा मानसिक कणखरपणा या दोन गोष्टींची त्याला मदत होते, असं म्हणत एबीडीने विराटच सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू असल्याचं आपलं मत मांडलं.
विराट आणि आपल्यामध्ये साम्य असणारे काही मुद्देही त्याने मांडले. एखाद्या गोष्टीसाठी झटणं हा आम्हा दोघांचा स्वभाव असुन शरणागती पत्करण्यात दोघांनाही आनंद मिळत नसल्याचं एबीडीने सांगितलं. एक खेळाडू म्हणून विराटसोबत वावरण्यात आनंद मिळत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.