मुंबई : इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढताना दिसत असून याचा फटका इंडिया क्रिकेट टीमला देखील बसला आहे. इंडिया टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. दरम्यान टीममधील 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच करण्याच्या आलेल्या चाचण्यांमध्ये 2 खेळाडूंची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापैकी एक खेळाडू बरा झाला असून कोरोनाची लागण झाल्यानंतर दुसऱ्या भारतीय खेळाडूला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अद्याप या सदस्यांचं नाव मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. 


इंग्लंडमध्ये अलीकडच्या काळात कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीये. यापूर्वी इंग्लड क्रिकेट टीममधील काही खेळाडूंना देखील कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान भारतीय खेळाडूंना लागण झाल्याच्या वृत्ताने भारतीय टीम मॅनेजमेन्ट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी एक मोठी चिंता निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीप्रमाणे, ज्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे त्याला काही दिवसांपूर्वी घसा खवखवत असल्याची तक्रार जाणवत होती. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. 


हा खेळाडू आयसोलेशनमध्ये असून त्याच्या संपर्कात आलेले इतर काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सदस्यांनाही तीन दिवसांसाठी अलग ठेवण्यात आलंय. सध्या, हा खेळाडू टीम इंडियासह डरहमच्या कॅम्पसाठी सहभागी होणार नाही. हा खेळाडू संसर्गातून बरा झाल्यानंतरच डरहमला जाईल.


न्यूझीलंड विरूद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर पडून काही वेळ घालवण्याची परवानगी देण्यात आली होती. 23 जून रोजी चॅम्पियनशिपची फायनल झाली. बीसीसीआयनेही परवानगी देताना खेळाडू आणि इतर कर्मचारी जुलैच्या मध्यात पुन्हा बायो बबलमध्ये परततली असल्याचं स्पष्ट केलं होतं. टीम इंडिया इंग्लंडविरोधात 5 मॅचेसची टेस्ट सिरीज खेळणार असून 4 ऑगस्टपासून याला सुरुवात होणार आहे.