मुंबई : इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पण भारतीय टीमची चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या अजूनही कायम आहे. वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सीरिजपर्यंतही भारताची चौथ्या क्रमांकासाठीची प्रयोगशाळा सुरु होती, पण याचं उत्तर मिळण्याऐवजी संभ्रम मात्र आणखी वाढला. पण आता भारतीय टीम प्रशासन चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरला पसंती देऊ शकते. आयपीएलच्या पहिल्या तीन आठवड्यानंतर म्हणजेच १५ ते २० एप्रिलदरम्यान वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा केली जाऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००३ वर्ल्ड कपमध्ये भारताने व्हीव्हीएस लक्ष्मणला डच्चू देऊन त्याच्याऐवजी बॅट्समन आणि डावखुरा स्पिनर दिनेश मोंगियाला संधी दिली होती. तर २०११ साली चौथ्या क्रमांकावर युवराज सिंग खेळला होता. या वर्ल्ड कपमध्ये युवराजने १५ विकेटही घेतल्या होत्या. युवराजच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचा २०११ वर्ल्ड कपमध्ये विजय झाला. युवराजला २०११ वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. विजय शंकरलाही २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये अशीच भूमिका दिली जाऊ शकते.


चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरचा प्रतिस्पर्धी हा अंबाती रायु़डू आहे. वनडे क्रिकेटमध्ये रायुडूची सरासरी ४७ ची असली तरी तो सध्या फॉर्ममध्ये नाही. काही महिन्यांपूर्वी रायु़डूचं चौथ्या क्रमांकासाठीचं भारतीय टीममधलं स्थान निश्चित होतं. विराटनेही रायुडू हा वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करेल, असं सांगितलं होतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर रायुडूला विश्रांती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ वनडेमध्ये भारताने चौथ्या क्रमांकावर रायुडू, ऋषभ पंत आणि कोहली या खेळाडूंना संधी दिली, पण एकालाही चमकदार कामगिरी करता आली नाही.


पीटीआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'वेलिंग्टनमध्ये ९० रनची खेळी केल्यानंतर अंबाती रायुडूने आत्मविश्वासपूर्वक खेळी केली नाही. पण आयपीएलमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली, तर मात्र परिस्थिती बदलू शकते. पण रायुडू हा फास्ट बॉलर समोर अस्वस्थ वाटतो, असा समज झाला आहे. विजय शंकर हा गरज असेल तेव्हा एक-एक रन काढून स्ट्राईक बदलू शकतो. तसंच आवश्यकतेनुसार तो फटकेबाजीही करू शकतो. वेलिंग्टनमध्येही त्याने त्याच्या फटकेबाजीची चुणूक दाखवली.'


'वर्ल्ड कपमध्ये खेळणारे आमचे अंतिम-११ खेळाडू निश्चित आहेत. फक्त इंग्लंडमधल्या वातावरणानुसार टीममध्ये एक बदल होईल. हार्दिक पांड्या टीममध्ये आल्यावर आम्हाला बॉलर म्हणून आणखी एक पर्याय मिळेल.' पण वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम हा धोका पत्करेल का? असा सवाल विचारण्यात आला असता आयपीएलपर्यंत थांबा, असं उत्तर देण्यात आलं.


अंबाती रायुडूने वनडेमध्ये ४७ च्या सरासरीने रन केल्या असल्या तरी त्याच्या बहुतेक मोठ्या खेळी या झिम्बाब्वे, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि वेस्ट इंडिज यांच्यासारख्या दुबळ्या टीमविरुद्धच्या आहेत. अंबाती रायुडूचा बॉलर म्हणूनही काही ओव्हरसाठी वापर होऊ शकत नाही. पण विजय शंकर बॉलिंगचा पर्याय देत असल्यामुळे त्याचा चौथ्या क्रमांकासाठी विचार होऊ शकतो. विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळवलं तर तो, केदार जाधव आणि हार्दिक पांड्या हे तिघं मिळून १० ओव्हरचा बॉलिंगचा कोटा पूर्ण करू शकतात.


चौथ्या क्रमांकाची समस्या सोडवण्यासाठी कर्णधार विराट कोहली एका मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर आला, तर केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. याचबरोबर ऋषभ पंतलाही चौथ्या क्रमांकावर खेळवलं गेलं. पण यातला कोणताही निर्णय यशस्वी ठरला नाही. आता आयपीएलदरम्यान चौथ्या क्रमांकासाठी खालील खेळाडू उपाय ठरू शकतात :


चौथा क्रमांक : ऋषभ पंत किंवा अंबाती रायुडू किंवा विजय शंकर


दुसरा विकेट कीपर : ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक


तिसरा स्पिनर किंवा चौथा फास्ट बॉलर : रवींद्र जडेजा किंवा उमेश यादव/ सिद्धार्थ कौल