लंडन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधली पहिली टेस्ट १ ऑगस्टला सुरू होणार आहे. पण या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम व्यवस्थापनानं भारतीय खेळाडूंना धक्का दिला आहे. पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी खेळाडूंनी त्यांची गर्लफ्रेंड किंवा बायकोला बरोबर आणू नये असं व्यवस्थापनानं खेळाडूंना सांगितलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. भारत आणि इंग्लंडमधली तिसरी टेस्ट २२ ऑगस्टला संपणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला तर वनडेमध्ये पहिली मॅच जिंकल्यानंतरही कोहलीच्या टीमला १-२नं पराभवाचा सामना करावा लागला. वनडे सीरिज जिंकल्यावर भारतीय खेळाडूंना त्यांच्या पत्नीबरोबर इंग्लंडमध्ये फिरण्याची परवानगी देण्यात आली होती. विराट कोहली, एम एस धोनी, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी त्यांच्या पत्नीसोबतचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले होते. यानंतर आता महिनाभर तरी खेळाडूंनी पत्नी किंवा गर्लफ्रेंडपासून लांब राहावं, असं व्यवस्थापनानं खेळाडूंना सांगितलं.


भारतीय टीमची खराब कामगिरी झाली तेव्हा खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड सोबत असल्यामुळे टीकेची झोड उठली होती. त्यामुळे भारतीय टीम व्यवस्थापनानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.