मुंबई : येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना झाली आहे. वर्ल्ड कपआधी भारतीय टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वर्ल्ड कपच्याआधी भारतीय टीमच्या जर्सीमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. 'मेन इन ब्लू' अशी ओळख असलेली भारतीय टीम भविष्यात आता 'मेन इन ऑरेंज' नावानंही ओळखला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशी क्रिकेट टीमसमोर आता भगव्या रंगाचे आव्हान असेल. कारण गेली कित्येक वर्ष निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणारी टीम आता भगव्या रंगाची जर्सी परिधान करुन मैदानात उतरु शकते. अनेक टीमची जर्सी सारख्याच रंगाची असल्याने हा बदल होण्याची शक्यता आहे. याखेरीज फुटबॉलप्रमाणे क्रिकेट खेळ अधिक रंजक करण्याच्या दृष्टीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने एक निर्णय घेण्याची शक्यता आहे. संघ होम ग्राऊंड आणि अवे ग्राऊंडवर दोन वेगवेगळ्या रंगाची जर्सी घालून खेळू शकतात. 


भारत, इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चारही टीमची जर्सी निळ्या रंगाची आहे. विश्वचषकादरम्यान इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्ताविरुद्ध भारत भगवी जर्सी परिधान करुन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. इंग्लंड ही यजमान टीम असल्याने या टीमविरुद्ध भारतासह इतरही टीम वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तर अफगाणिस्तानविरुद्धही टीम इंडिया ऑरेंज जर्सीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. तर बीसीसीआयच्या काही सूत्रांनी जर्सी पूर्ण भगवी नसून केवळ भगव्या रंगाच्या छटा जर्सीवर असू शकतात, असं सांगितलं


पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका या टीमच्या जर्सी हिरव्या रंगाच्या आहेत. त्यामुळे त्यांनाही आपापल्या जर्सीमध्ये काही बदल करावे लागण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड टीमच्या जर्सीचे रंग वेगवेगळे असल्याने त्यांना रंगात बदल करावे लागणार नाही. त्यामुळे आता भारतीय टीम विश्वचषकासाठी कोणत्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.