दुबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या चिंता वाढल्या आहेत. यूएईमध्ये आयपीएल सुरु आहे. पण या दरम्यान भारताच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे आयपीएल २०२० मधून बाहेर पडले आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जायचे आहे. भारतीय संघ येथे टेस्ट, वनडे आणि टी-20 सिरीज खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना डे-नाईट सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौर्‍याआधी भारतीय वेगवान गोलंदाजांना दुखापत होणे बीसीसीआयसाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे. 


ईशांत शर्मा आणि भुवी यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निश्चितच निवड झाली असती. पण आता दुखापतीमुळे त्यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.


भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल संपल्यानंतरच दुबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ऑक्टोबरच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. भुवी आणि इशांतची दुखापत अधिक गंभीर असल्यास काही नवीन बॉलर्सला ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाईल.


दुसरीकडे ऋषभ पंत देखील दुखापतीमुळे आयपीएलचे काही सामने खेळू शकणार नाही. आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडूंना होणारी दुखापत ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या आधी चिंतेचं कारण ठरत आहे.