डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतीय टीमला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पसंती देण्यात येतेय. मात्र, अंडरडॉग्ज भारतीय टीम कांगारुंना पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्नशील असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच झाली आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर मिथाली राजच्या टीमनं सेमी फायनलपर्यंत मजल मारली आहे. भारतासाठी या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक मॅचमध्ये एक नवी मॅचविनर समोर आली आहे. आता भारताची खरी परीक्षा ही सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमशी होणार आहे. त्यातच लीग मॅचमध्ये भारताला कांगारुंकडून सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे अॅडव्हान्टेज हे ऑस्ट्रेलियन टीमला असेल. मात्र, भारतीय टीमची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियन टीम मिथाली राजच्या टीमला कमी लेखण्याची चूक करणार नाही. भारतीय बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत. त्याचप्रमाणे बॉलर्सही चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे भारत हॉट फेव्हरिट असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कडवी टक्कर देण्यास प्रयत्नशील असेल. 


भारताची बॅटिंगची भिस्त ही स्मृती मानधना, पूनम राऊत, कॅप्टन मिथाली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मावर असेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या स्मृती मानधनानं चमकदार कामगिरी केली होती. मात्र, यानंतर तिचा फॉर्म हरवल्यानं कॅप्टन मिथालीच्या चिंतेत आणखी भर पडलीय. मात्र, हरमनप्रीत कौरला फॉर्म गवसल्यानं भारताची बॅटिंग आणखी मजबूत झाली आहे. बॉलिंगमध्ये अनुभवी झुलन गोस्वामीला दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाडची साथ मिळणार आहे.


ऑस्ट्रेलियानं लीग मॅचेसमध्ये सहा मॅचेसमध्ये विजय मिळवलेत. तर भारताला पाच मॅचेस जिंकण्यात यश आलं आहे. दरम्यान, भारतानं सलग चार मॅच ज्या डर्बी मैदानावर खेळल्यात. त्याचठिकाणी त्यांचा सेमी फायनलचा मुकाबला. तर कांगारुंची या मैदानावर पहिलीच लढत होणार आहे. आता मिथाली राजची टीम ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचा धक्का देत फायनल गाठते का याकडेच क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.