न्यूझीलंड : भारतीय महिला क्रिकेट संघात २०१८ च्या अखेरीस वादळ आल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर संघातच दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. पण, त्यानंतरही आता संघ पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनेही संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाला आपली गरज नाही असं वाटत असलं तरीही एक अनुभवी खेळाडू आणि फलंदाज म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. संघातील फलंदाजांच्या फळीला एकत्र ठेवणं हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग, आहे ज्यासाठी मी सज्ज असल्याचं मिताली म्हणाली. भारतीय महिला संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या सुरुवातीलाच तिने आपली भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त एएनआयने प्रसिद्ध केलं. 


टी२० महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासोबत असणारे मतभेद दूर सारत संघातील प्रत्येक खेळाडू आणि पर्यायी संपूर्ण संघच सध्या चांगल्या स्थितीत असल्याची बाबही तिने अधोरेखित केली. 


'सद्यस्थिती पाहता आम्ही सर्वजण अगदी चांगल्या फॉर्ममध्ये आहोत. मग ती स्मृती मंधाना असो, हरमनप्रीत असो किंवा नवोदित खेळाडू जेमिमा रोड्रीगेज असो. मधल्या फळीसोबतच संघातील ऑल राऊंडर खेळाडूही चांगल्या स्थितीत आहेत. प्रत्येकाच्याच कामगिरीमुळे संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान मिळालं आहे', असं ती म्हणाली.  


संघातील प्रत्येक महिला खेळाडू ही सराव शिबिरातूनच या दौऱ्यावर आली आहे. स्थानिक क्रिकेट असे किंवा एखादा लीग सामना, प्रत्येकीनेच तगडा सराव केल्याचं म्हणत न्यूझीलंडच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून साधारण आठवडाभर आधीच संघ यजमान देशात पोहोचल्याचं तिने स्पष्ट केलं. त्यासोबतच सराव सामना आणि येऊ घातलेल्या मालिकेसाठीची सर्व तयारी जोमाने सुरु असल्याचंही मितालीने सांगितलं. 


न्यूझीलंडच्या खेळपट्टीविषयीही तिने अभ्यासपूर्वकत वक्तव्य करत संघाच्या फिरकी गोलंदाजांची प्रशंसा करत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचं ती म्हणाली. काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघात प्रशिक्षक रमेश पोवार आणि सहखेळाडू हरमनप्रीत कौरसोबत झालेल्य मतभेदाविषयीही तिने सूचक वक्तव्य केलं. क्रिकेट या खेळाने आपल्याला सतत पुढे जाण्यास आणि नव्या खेळासाठी (आव्हानांसाठी) सज्ज होण्याची शिकवण दिली, असं ती म्हणाली.



त्या मतभेदांविषयी मिताली म्हणते...


'आंतरराष्ट्रीय पातळीवर एक क्रिकेटपटू म्हणून खेळणं ही बाब किती महत्त्वाची आहे, सर्वजण जाणतात. इथे आम्ही देशाचं प्रतिनिधीत्व करतो आणि इथे आम्ही एक संघ म्हणून खेळणं अपेक्षित आहे. जे झालं त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, त्या गोष्टीं मागेच सारणं गरजेचं आहे', असं म्हणत ही मालिका सर्वतोपरी महत्त्वाची असल्याचं तिने स्पष्ट केलं.