INDvsAUS: कॅचनी मॅच घालवली, चौथ्या वनडेमध्ये भारताचा पराभव
विजयी आव्हानाचा पाठलाग करतान ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
मोहाली : एश्टन टर्नरच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा चौथ्या वनडेमध्ये विजय झाला आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३५९ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६ विकेटच्या मोबदल्यात ३५९ रनचे आव्हान ४७.५ ओव्हर मध्ये पूर्ण केले. यामुळे ५ मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं २-२ अशी बरोबरी केली आहे. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
पीटर हॅंड्सकॉम्ब आऊट झाल्यानंतर एलेक्स कॅरी आणि एश्टन टर्नर या जोडीने कांगारुंना विजय मिळवून दिला. खराब फिल्डींग देखील भारताच्या पराभवाचं कारण ठरलं आहे. एश्टॅन टर्नरची कॅच सोडल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताकडून या मॅचमध्ये मोक्याच्या क्षणी ऋषभ पंत, केदार जाधव आणि शिखर धवन यांनी कॅच सोडले. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हॅंड्सकॉम्बने सर्वाधिक ११७ रन केल्या. तर मागील मॅचमध्ये शतक ठोकलेल्या उस्मान ख्वाजाने ९१ रन आणि एश्टन टर्नरने गरजेच्या वेळी ४३ बॉलमध्ये नाबाद ८४ रनची आक्रमक खेळी केली.
विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने सुरुवातीला धक्के देण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का भुवनेश्वर कुमारने दिला. कॅप्टन एरॉन फिंचला भोपळा देखील फोडता आला नाही. फिंचला भुवनेश्वरने बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ३ असताना फिंच आऊट झाला. यानंतर आलेल्या शॉन मार्शला बुमराहने बाहेरचा रस्ता दाखवला. मार्शला बुमराहने बोल्ड केले.
ऑस्ट्रेलियाने पहिले दोन विकेट स्वस्तात गमावल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि पीटर पीटर हॅंड्सकॉम्बने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १९२ रन्सची पार्टनरशीप झाली. या जोडीला तोडण्यास बुमराहला यश आले. बुमराहने ख्वाजाला कुलदीप यादवच्या हाती कॅचआऊट केले.
ऑस्ट्रेलियाने आपली तिसरी विकेट २०४ रन्सवर गमावली. उस्मान ख्वाजा ९१ रनवर आऊट झाला. ख्वाजानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला २३ रनवर असताना कुलदीप यादवने बाहेरचा रस्ता दाखवला. मॅक्सवेल आऊट झाल्यानंतर एश्टन टर्नरने हँड्सकॉम्बला योग्य साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४२ रन्स जोडल्या. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २७१ असताना हँड्सकॉम्ब आऊट झाला. त्याला युजवेंद्र चहालने ११७ रनवर आऊट केले. भारताकडून सर्वाधिक ३ विकेट जसप्रीत बुमराहने घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी विकेट घेतली.
याआधी भारताने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३५९ रन्सचे तगडे आव्हान दिले होते. धवन आणि रोहित शर्माच्या दमदार सलामीच्या पार्टनरशीपच्या जोरावर भारताला ३५० रन्सचा टप्पा पार करता आला. भारताने ५० ओव्हरमध्ये ९ विकेटच्या मोबदल्यात ३५८ रन केल्या. भारताकडून धवनने सर्वाधिक १४३ रन केल्या. तर रोहितचे शतक केवळ ५ रन्सने हुकले. तो ९५ रनवर आऊट झाला. भारताच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगली साथ दिली. लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि विजय शंकर या तिघांनी अनुक्रमे २६, ३६ आणि २६ रन केल्या.