ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिलीच टेस्ट मॅच जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. भारतानं ठेवलेल्या ३२३ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम २९१ रनवर ऑल आऊट झाली. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. आता या दोन्ही टीम पर्थमध्ये दुसरी टेस्ट मॅच खेळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८ साली पर्थमध्ये भारताचा विजय झाला होता. त्या मॅचमध्ये भारतानं पहिल्या इनिंगमध्ये ३३० रन केले होते. यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाची टीम २१२ रनवर ऑल आऊट झाली होती. भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये २९४ रन करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४१३ रनचं आव्हान दिलं. एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम ३४० रनवर ऑल आऊट झाली आणि भारतानं ही मॅच ७२ रननी जिंकली.


वाका मैदानात मॅच नाही


भारतानं मिळवलेला तो विजय पर्थच्या वाका मैदानातला होता. यावेळी मात्र पर्थमधल्या ऑपटस नावाच्या मैदानात मॅच होणार आहे. या मैदानातली खेळपट्टीही वाकाच्या खेळपट्टीप्रमाणेच जलद असेल, असं बोललं जातंय. खेळपट्टी जलद असली तरी भारताकडे मात्र तशाच प्रकारची फास्ट बॉलिंग असल्यामुळे कर्णधार विराट कोहली फारसा चिंतेत नसेल.


कुठे आणि कशी पाहाल मॅच?


-पर्थमध्ये शुक्रवार १४ डिसेंबरपासून टेस्ट मॅचला सुरुवात होईल


- भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता मॅच सुरु होईल.


- या मॅचची इंग्रजी कॉमेंट्री सोनी सिक्सवर आणि हिंदी कॉमेंट्री सोनी टेन ३ वर पाहता येईल.


- दुसरी टेस्ट ऑनलाईन सोनी लिववर पाहता येईल.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मॅचमध्ये विराट पहिल्या इनिंगमध्ये ३ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३४ रन करून आऊट झाला. त्यामुळे पर्थमध्ये विराट मोठी खेळी करण्यासाठी मैदानात उतरेल. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमला फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराला आऊट करण्याचं आव्हान असेल. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं १२३ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ७१ रनची खेळी केली.