म्हणून बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर टी-२० टीमसोबत नाही तर सिडनीमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजला बुधवारपासून ब्रिस्बेनमधून सुरुवात झाली आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजला बुधवारपासून ब्रिस्बेनमधून सुरुवात झाली आहे. पण भारतीय टीमचे बॅटिंग प्रशिक्षक टी-२० टीमसोबत नाहीत तर सिडनीमध्ये आहेत. टेस्ट टीमच्या खेळाडूंच्या मदतीसाठी बांगर सिडनीमध्ये गेले आहेत. टेस्ट सीरिजची सुरुवात ६ डिसेंबरपासून ऍडलेडमधून सुरु होईल. संजय बांगर पृथ्वी शॉ, हनुमा विहारी या खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढचे ५ दिवस नेट सत्रात सहभागी होतील. संजय बांगर थ्रो डाऊन तज्ज्ञ नुवान आणि लॉजिस्टिक मॅनेजर यांच्यासोबत सिडनीला गेले असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या खेळाडूंना मिळणार प्रशिक्षण
पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी हे दोघे अजून लहान आहेत. त्यांचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत बांगर या खेळाडूंबरोबरच अजिंक्य रहाणे, मुरली विजय आणि पार्थिव पटेलला प्रशिक्षण देतील, असं अधिकाऱ्यांनं सांगितलं.
ऑस्ट्रेलियाकडून सरावासाठी बॉलर मिळणार
मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे फास्ट बॉलर लवकरच ऑस्ट्रेलियाला पोहोचतील. तोपर्यंत भारतीय बॅट्समनना नेटमध्ये न्यू साऊथ वेल्सचे फास्ट बॉलर सराव देतील. आमचे दुसऱ्या फळीतले काही फास्ट बॉलर न्यूझीलंडमध्ये तर काही रणजी ट्रॉफी खेळत आहेत. त्यामुळे आम्ही या बॉलरना बोलवालं नाही, त्याऐवजी आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलून न्यू साऊथ वेल्सचे चांगले बॉलर सरावासाठी घेतले, असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केलं.