पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. या विजयाबरोबरच ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं १-०ची आघाडी घेतली आहे. आता शुक्रवारी १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या मॅचमध्ये सीरिज बरोबरीत आणण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे असणार आहे. पण ऑस्ट्रेलियाची मागच्या एक वर्षातली कामगिरी बघता हे आव्हान कठीण दिसतंय. मागच्या एक वर्षातलं ऑस्ट्रेलियाचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं आहे. याआधी १९८४ साली ऑस्ट्रेलियानं एवढी खराब कामगिरी केली होती. एकेकाळच्या जगजेत्या टीमवर ही नामुष्की ओढावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियानं २३५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २९१ रन केले. या दोन्ही इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला ३०० रनचा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत २०१८ साली हे पहिल्यांदाच झालं नाही. मागच्या १३ इनिंगमध्ये फक्त एकदाच ऑस्ट्रेलियाला ३०० रनचा आकडा गाठता आला. याआधी ३४ वर्षांपूर्वी १९८४ साली ऑस्ट्रेलियानं अशाच पद्धतीनं कामगिरी केली होती. तेव्हा १९ पैकी फक्त एका इनिंगमध्ये त्यांना ३०० रनचा आकडा ओलांडता आला होता.


युएईमध्ये बनवले ३०० पेक्षा जास्त रन


ऑस्ट्रेलियानं युएईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटचा ३०० पेक्षा जास्तचा स्कोअर केला होता. ७-११ ऑक्टोबरदरम्यान ही मॅच झाली होती. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियानं २०२ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३६२/८ असा स्कोअर केला होता. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला ही मॅच ड्रॉ करण्यात यश आलं. यानंतरच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियानं निराश करत १४५ रन आणि १६४ रन केले. ही मॅच ऑस्ट्रेलियाला गमवावी लागली होती.


दक्षिण आफ्रिकेत ८ इनिंग, एकदाच केले ३०० रन


ऑस्ट्रेलियानं यावर्षी दक्षिण आफ्रिकेत मार्च-एप्रिलमध्ये ४ टेस्ट मॅचची सीरिज खेळली होती. या सीरिजच्या पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियानं ३५१ रन केले होते. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा ११८ रननी विजय झाला होता. यानंतरच्या ३ टेस्टच्या ६ इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियानं २४३, २३९, २५५, १०७, २२१ आणि ११९ रन केले होते. या तिन्ही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता.


३ सीरिजमध्ये फक्त २ वेळा ३०० रन


ही सीरिज आणि मागच्या २ सीरिज बघितल्या तर ऑस्ट्रेलियाला फक्त २ वेळा ३०० रनचा आकडा ओलांडता आला होता. या दोनवेळा ऑस्ट्रेलिया मॅच हरली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३०० रनमध्ये रोखण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.


स्मिथ-वॉर्नरची अनुपस्थिती


ऑस्ट्रेलियाची अशी वाईट अवस्था स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि बँक्रॉफ्टचं निलंबन करण्यात आलं आहे. स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची तर बँक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.