भारतीय टीमची तक्रार करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीचा झटका
भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी सैन्याची टोपी घातली होती.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी सैन्याची टोपी घातली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय टीमचं सैन्याची टोपी घालणं जास्तच झोंबलं होतं. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका लागला आहे. भारतीय टीमने लष्कराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांसारखी टोपी घातली होती, आणि आयसीसीनं याला परवानगी दिली होती, असं खुद्द आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.
भारतीय टीमने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांचा सन्मान म्हणून तिसऱ्या वनडेमध्ये सैनिकांसारखी टोपी घातली होती. एवढच नाही तर खेळाडूंनी त्यांचं मॅचचं मानधन राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी दिलं. याबद्दल आयसीसीचे महाप्रबंधक क्लेरी फुर्लोग म्हणाले 'बीसीसीआयने पैसे गोळा करण्यासाठी आणि शहीद सैनिकांचा सन्मान म्हणून टोपी घालण्यासाठी परवानगी मागितली होती आणि आम्ही अशी परवानगी दिली होती.'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीला पत्र लिहून अशाप्रकारे टोपी घालण्याबद्दल भारतीय टीमवर कारवाईची मागणी केली होती. 'वेगळ्या उद्देशासाठी त्यांनी आयसीसीची परवानगी मागितली होती, पण भलत्याच कारणासाठी याचा उपयोग केला गेला, भारतीय टीमच्या या भूमिकेचा स्वीकार होऊ शकत नाही', अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी यांनी दिली होती.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले. दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या देशांवर बंदी घालावी, अशी मागणी बीसीसीआयनं आयसीसीला केली होती. पण या पत्रात बीसीसीआयने पाकिस्तानचा थेट उल्लेख केला नव्हता. आयसीसीने मात्र अशाप्रकारे कारवाई करता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.
भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणलेल्या संबंधांमुळे आगामी वर्ल्ड कपमध्येही भारतानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनी या मागणीचं समर्थन केलं आहे. तर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. मॅच न खेळता पाकिस्तानला फुकटचे २ पॉईंट का द्यायचे? त्यापेक्षा त्यांना पराभूत करून वर्ल्ड कपमधूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, असं मत सचिन आणि गावसकर यांनी मांडलं. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. १६ जूनला भारत आणि पाकिस्तानमधला सामना नियोजित आहे.