ऑस्ट्रेलियाविरुद्ध या खेळाडूंना विश्रांती, शास्त्रींचे संकेत
ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला आहे.
वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. पाचव्या वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा ३५ रननी पराभव केला आणि सीरिज ४-१नं जिंकली. यानंतर आता भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० मॅचची सीरिज खेळेल. ही सीरिज संपल्यावर ऑस्ट्रेलियाची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ५ वनडे मॅच आणि २ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारताची ही शेवटची सीरिज असेल. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल.
वर्ल्ड कपआधी भारतीय टीम काही खेळाडूंना आराम देईल, असं भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे. २४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळाडूंना विश्रांती मिळेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये हेच खेळाडू दिसतील का नव्या खेळाडूंना संधी मिळेल? असा प्रश्न सुनील गावसकर यांनी रवी शास्त्रींना विचारला. याबद्दल आम्ही निवड समितीशी चर्चा केली आहे. आम्ही काही खेळाडूंना आराम देऊ. मोहम्मद शमीला विश्रांतीची गरज आहे. बुमराह पुनरागमन करेल, ही चांगली गोष्ट आहे. भुवनेश्वरवरही लक्ष ठेवलं जाईल. गरज पडली तर त्यालाही विश्रांती देण्यात येईल, असं उत्तर शास्त्रींनी दिलं.
बॉलरप्रमाणेच बॅट्समननाही विश्रांतीची गरज असल्याचं रवी शास्त्रींनी बोलून दाखवलं. रोहित शर्मा आणि शिखर धवन लागोपाठ क्रिकेट खेळत आहेत. या दोघांना पुढेही क्रिकेट खेळायचं आहे. काही मॅचमध्ये आम्ही दुसऱ्यांना संधी देऊ शकतो. त्यामुळे जे खेळाडू सध्या टीममध्ये नाहीत, त्यांना वर्ल्ड कपआधी सराव मिळेल. या खेळाडूंनी मोठा स्कोअर केला, तर वर्ल्ड कपला जाताना त्यांची मानसिकता चांगली असेल, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधल्या पहिल्या तिन्ही वनडे भारतानं जिंकल्या आणि सीरिज खिशात टाकली. यानंतर चौथ्या वनडेमध्ये भारताचा फक्त ९२ रनवर ऑलआऊट झाल्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. यानंतर पाचव्या वनडेमध्ये पुन्हा विजय मिळवत भारतानं ही सीरिज ४-१नं जिंकली. पहिल्यांदाच भारतानं न्यूझीलंडमध्ये वनडे सीरिजच्या ४ मॅच जिंकल्या आहेत.