मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये भारतानं ओपनर केएल राहुल आणि मुरली विजयला डच्चू दिला. या दोघांऐवजी भारतानं रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालला संधी दिली, तर फास्ट बॉलर उमेश यादवच्याऐवजी स्पिनर रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मयंक अग्रवालसोबत हनुमा विहारी ओपनिंगला खेळेल, असं भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयंक अग्रवाल मागच्या २ वर्षांपासून स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तरीही त्याला भारतीय टीममध्ये संधी मिळत नव्हती. भारतामध्ये नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी मयंक अग्रवालची निवड करण्यात आली. पण त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही.


कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या मयंक अग्रवालनं सचिन तेंडुलकरला पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. गेल्या कित्येक दिवसांपासून मयंक स्थानिक क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटमध्ये खोऱ्यानं रन काढत भारतीय टीममधल्या प्रवेशाचा दरवाजा ठोठावत होता. यादरम्यान मयंकनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचे रेकॉर्डही मोडले आहेत. मयंक अग्रवालच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे.


१०व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात


सचिन तेंडुलकरला खेळताना पाहून आपण १०व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्याचं मयंक सांगतो. उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या कॅम्पमधून माझ्या क्रिकेटला सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया मयंकनं दिली आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळताना पाहिलं, तेव्हा आपण पण क्रिकेट खेळावं, असा विचार माझ्या मनात आला. किती क्रिकेट खेळता येईल हे माहिती नव्हतं, पण प्रयत्न नक्की करू असं मी मनाशी ठरवलं होतं, असं वक्तव्य मयंक अग्रवालनं केलं आहे.


१०वी नंतर क्रिकेटसाठी गंभीर


१०वीची परीक्षा पास झालो तेव्हा माझं वय १५-१६ वर्ष होतं. तेव्हा शिक्षण का क्रिकेट याबद्दल निर्णय घ्यायचा होता. मी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि क्रिकेटमध्येच कारकिर्द बनवायची, असं मी ठरवल्याचं मयंकनं सांगितलं.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या दोन टेस्टमध्ये केएल राहुल आणि मुरली विजय सपशेल अपयशी ठरले. तर पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे तो संपूर्ण सीरिजला मुकणार आहे. त्यामुळे भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं मयंक अग्रवालवर विश्वास दाखवला आहे.


वीरेंद्र सेहवाग आदर्श


भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग मयंक अग्रवालचा आदर्श आहे. वीरेंद्र सेहवाग आधीपासूनच विरोधी टीमवर आक्रमण करायचा. त्याच्या खेळण्याची पद्धत एकदम सोपी होती. त्याचा अंदाज मला नेहमीच आकर्षित करत आला आहे, असं मयंक अग्रवाल म्हणतो.


मयंक अग्रवालची कारकिर्द


२७ वर्षांच्या मयंक अग्रवालनं ४६ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ४९.९८ च्या सरासरीनं ३,५९९ रन केले आहेत. यामध्ये ८ शतकं आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. ३०४ नाबाद हा मयंक अग्रवालचा सर्वाधिक स्कोअर आहे.