नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी विजय झाला. या मॅचमध्ये विराट कोहलीनं शतक केलं असलं तरी ऑलराऊंडर विजय शंकर हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. भारतानं ठेवलेल्या २५१ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ४९.३ ओव्हरमध्ये २४२ रनवर ऑलआऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ रनची आवश्यकता होती. पण विजय शंकरनं पहिले धोकादायक मार्कस स्टॉयनिसची आणि मग ऍडम झम्पाची विकेट घेतली, आणि भारताला विजय मिळवून दिला. मार्कस स्टॉयनिसनं ६५ बॉलमध्ये ५२ रन केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या ३ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ रनची गरज होती. यावेळी बुमराहनं ४८वी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये बुमराहनं फक्त १ रन दिली. कोहलीनं ४९व्या ओव्हरसाठी शमीच्या हातात बॉल दिला. या ओव्हरमध्ये शमीनं ९ रन दिले. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ रनची आवश्यकता होती. शेवटच्या ओव्हरमध्ये विजय शंकर किंवा केदार जाधव यांना बॉलिंग देण्याचा पर्याय विराटकडे होता. अखेर विराटनं विजय शंकरला बॉलिंग दिली आणि त्यानंही कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. 


याआधी बॅटिंग करतानाही विजय शंकरनं चमकदार कामगिरी केली होती. विराट वगळता इतर भारतीय बॅट्समनना अडचणी येत असताना विजय शंकरनं ४१ बॉलमध्ये ४६ रन केले होते. तर विराट कोहलीनं वनडे कारकिर्दीतलं त्याचं ४०वं शतक झळकावलं. विराट कोहलीनं १२० बॉलमध्ये ११६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोरचा समावेश होता. खरं तर विजय शंकरचं पहिलं अर्धशतक करण्याचं स्वप्न विराट कोहलीच्या एका शॉटमुळे भंगलं. विराटनं मारलेला स्ट्रेट ड्राईव्हचा बॉल बॉलर एडम झम्पाच्या हाताला लागून स्टम्पला लागला. यावेळी विजय शंकर क्रीजच्या बाहेर असल्यामुळे रन आऊट झाला. ४६ रन हा विजय शंकरचा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी विजय शंकरचा सर्वाधिक स्कोअर ४५ रन होता. योगायोग म्हणजे त्या मॅचमध्येही शंकर रन आऊटच झाला होता. 


'संधीची वाट बघत होतो'


मॅच संपल्यानंतर विजय शंकर म्हणाला 'माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी या संधीची वाटच बघत होतो. दबावामध्ये चांगली कामगिरी करण्याची माझी इच्छा होती. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याचा आनंद मी घेतला. शेवटची ओव्हर मला टाकायला मिळेल, याची मी वाट बघत होतो. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला अशा आव्हानांसाठी तयार असावं लागतं. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त मानसिकदृष्ट्या स्पष्ट असणं आवश्यक होतं. मला फक्त योग्य जागेवर योग्य बॉल टाकायचा होता आणि मी तसंच केलं. मला स्वत:वर विश्वास होता.' या मॅचमध्ये विजय शंकरने १.३ ओव्हरमध्ये १५ रन देऊन २ विकेट घेतल्या.


विजय शंकर हा या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला असला, तरी एक वर्षापूर्वी निदहास ट्रॉफीवेळी विजय शंकरला सोशल मीडियावरून व्हिलन ठरवण्यात आलं होतं.


निदहास ट्रॉफीचा व्हिलन


मागच्यावर्षी निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये केलेल्या खेळीमुळे विजय शंकरवर भारतातल्या क्रिकेट रसिकांनी जोरदार टीका केली होती. शेवटच्या बॉलवर विजयासाठी ५ रनची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. पण या विजयानंतरही विजय शंकरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.


निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला विजयसाठी १८ बॉलमध्ये ३५ रनची आवश्यकता होती. यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं मुस्तफिजूरकडे बॉल दिला. या ओव्हरच्या पहिल्या चारही बॉलला विजय शंकरला एकही रन काढता आली नाही. पाचव्या बॉलला विजय शंकरनं लेग बायच्या रुपात एक रन काढली, आणि मनिष पांडेला स्ट्राईक दिला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मनिष पांडे आऊट झाला.


यानंतर बॅटिंगला आलेल्या दिनेश कार्तिकनं एकहाती मॅच फिरवली. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.