नवी दिल्ली : वर्ल्ड कप आधीची शेवटची सीरिज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ वनडे आणि ५ टी-२० मॅचमध्ये भारतीय टीमची प्रयोगशाळा झाली होती. ५ वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर भारतीय टीमने तब्बल तीन वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली. पण यातल्या एकाही खेळाडूला २५ पेक्षा जास्त रन करता आल्या नाहीत. पाचव्या वनडेमध्येही चौथ्या क्रमांकावर खेळणारा पंत अपयशी ठरला. वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची वनडे होती. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा संभ्रम घेऊनच जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने पहिल्या तीन वनडेमध्ये अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर खेळवलं. या सीरिजआधी रायुडू हाच वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळेल, असं बोललं जात होतं. पण या सीरिजमध्ये रायुडू अपयशी ठरला. रायुडूने ३ मॅचमध्ये अनुक्रमे १३, १८ आणि २ रन केले. यानंतर चौथ्या वनडेमध्ये रायुडूला टीममधून बाहेर ठेवण्यात आलं. असं असलं तरी रायुडूची वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये निवड होऊ शकते.


भारतीय टीमने चौथ्या वनडेमध्ये रायुडूला बाहेर केलं आणि धोनीलाही विश्रांती देण्यात आली. या दोघांऐवजी राहुल आणि ऋषभ पंतला संधी देण्यात आली. पण हे दोघंही चौथ्या क्रमांकावर खेळले नाहीत. कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला पण तो ७ रनवर आऊट झाला. राहुल या मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला होता, पण त्याला २६ रन करता आले. तर ऋषभ पंतनं पाचव्या क्रमांकावर २४ बॉलमध्ये ३६ रन केले.


दिल्लीतल्या पाचव्या वनडेमध्ये ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळला. या मॅचमध्ये पंतने चांगली सुरुवात केली. सुरुवातीला पंतने एक फोर आणि एक सिक्स मारली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. १६ रन करून पंत आऊट झाला.


पंत आऊट झाल्यानंतर भारताला चौथ्या क्रमांकासाठी कोणताच खेळाडू सापडला नसल्याचं स्पष्ट झालं. आता भारतापुढे अंबाती रायुडूवर पुन्हा एकदा विश्वास टाकण्याचा पर्याय आहे. कारण मागच्या वर्षभरात रायुडूनं चौथ्या क्रमांकावर ठीकठाक कामगिरी केली आहे. विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळला नसला, तरी त्याने परिपक्वता दाखवली आहे, त्यामुळे त्याचाही विचार केला जाऊ शकतो.


चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी भारताकडे एमएस धोनीचाही पर्याय आहे. पण त्यासाठी भारताला पाचव्या क्रमांकावर एखाद्या भरवशाच्या खेळाडूला खेळवावं लागेल. वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना भारतीय टीमपुढे असलेली ही समस्या नक्कीच अडचणीची आहे.