INDvsAUS: रोहित शर्माची विक्रमाला गवसणी, विराटलाही जमलं नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ९५ रनची खेळी केली.
मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ९५ रनची खेळी केली. ५ रननी रोहित शर्माचं शतक हुकलं असलं तरी रोहितनं भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मानं वनडेमध्ये भारतात सगळ्यात जलद ३ हजार रन करण्याचा रेकॉर्ड केला आहे. रोहित शर्मानं ५७ वनडे इनिंगमध्ये हा टप्पा गाठला. मायदेशामध्ये सगळ्यात जलद ३ हजार रन करण्याच्या विक्रमाशीही रोहितनं बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हशीम अमलानंही ५७ वनडे इनिंगमध्ये ३ हजार रन पूर्ण केले होते.
भारतामध्ये सगळ्यात जलद ३ हजार रन पूर्ण करण्याचं रेकॉर्ड याआधी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होतं. विराट कोहलीनं ६३ वनडे इनिंगमध्ये ३ हजार रन केले होते.
गेल्या काही मॅचपासून रोहित-धवन या जोडीला भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यास सातत्याने अपयश येत होते. पण या जोडीने ही उणीव देखील भरुन काढली. या दोघांनी भारताला पहिल्या विकेटसाठी १९३ रनची पार्टनरशीप मिळवून दिली. यामुळे ही पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशीप आतापर्यंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धची विक्रमी पार्टनरशीप ठरली.
याआधी देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी विक्रमी पार्टनरशीपचा रेकॉर्ड धवन-रोहित या जोडीच्या नावे होता. या जोडीने २०१३ ला नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये १७८ रनची पार्टनरशीप केली होती.
रोहित-धवन या जोडीने आतापर्यंत एकत्र खेळताना एकूण ४,५७१ रनची पार्टनरशीप केली आहे. या पार्टनरशीपमुळे रोहित-धवनने सचिन-सेहवाग या जोडीला मागे टाकले आहे. सचिन-सेहवाग या जोडीने आपल्या कारकिर्दीत एकत्र खेळताना एकूण ४,३८७ रनची पार्टनरशीप केली होती. पार्टनरशीरपच्या बाबतीत भारताकडून सर्वाधिक रनचा विक्रम हा गांगुली-सचिन या जोडीच्या नावे आहे. या जोडीने पार्टनरशीप करताना एकूण ८,२२७ रन केल्या होत्या.
सचिन-सेहवाग या जोडीने ११४ इनिंगमध्ये ४,३८७ रन केले होते. तर रोहित-धवनच्या जोडीने फक्त १०२ इनिंगमध्येच हे रेकॉर्ड केलं आहे.