पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १४६ रननी पराभव झाला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये कमबॅक केलं आहे. ही टेस्ट सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. पण भारतीय टीमच्या दुसऱ्या टेस्टमधल्या कामगिरीमुळे सुनील गावसकर चांगलेच भडकले आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला पुन्हा घरी पाठवा आणि स्थानिक क्रिकेट खेळायला लावा, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तरच राहुलला तिसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळेल, असं गावसकर म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलला भारतात परत पाठवून कर्नाटककडून रणजी खेळायला सांगाव, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. राहुल हा फक्त फॉर्ममध्येच नाही, तर खेळातच त्याचं लक्ष दिसत नसल्याचे कठोर शब्द गावसकर यांनी वापरले. राहुल मला चुकीचं सिद्ध करू शकतो. भारतीय टीमच्या चांगल्यासाठी मी चुकीचं सिद्ध व्हायलाही तयार आहे, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.


गावसकर यांचा कोहली-शास्त्रीवरही निशाणा


शेवटच्या २ टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला तर कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या भूमिकेचीही समीक्षा झाली पाहिजे, असं मत गावसकर यांनी व्यक्त केलं. या मॅचमध्ये भारतानं टीमची निवड करतानाही चूक केली. भारत या मॅचमध्ये ४ फास्ट बॉलर घेऊन तर ऑस्ट्रेलिया ३ फास्ट बॉलर आणि नॅथन लायन या स्पिनरला घेऊन मैदानात उतरली. पण लायननंच भारताला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या टीम निवडीवरही गावसकर भडकले आणि टीम प्रशासनावर टीका केली.


'१९ कशाला ४० खेळाडू न्या'


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी १९ खेळाडूंची निवड करणंही गावसकर यांना पटलेलं नाही. १९ खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला न्यायची परवानगी कोणी दिली? १९ जणांना परवानगी देण्यात आली मग आणखी ३ जणांना का नेण्यात आलं नाही? बीसीसीआय श्रीमंत संस्था आहे. ते ४० जणांची टीमही ऑस्ट्रेलियाला पाठवू शकतात. पण १९ खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवून निवड समितीही त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत नाहीये, असं गावसकर म्हणाले.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीम निवडीमध्ये मोठ्या चुका होत आहेत. आम्ही हे कधीपासून पाहत आहे. याचं नुकसान टीमला होतंय, कारण टीमला मॅच गमवाव्या लागत आहेत. जर टीमची निवड योग्य झाली असती तर भारतला मॅच जिंकता आली असती, असं गावसकर यांना वाटतंय.


कोहली-शास्त्रींना कानपिचक्या


कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीला टीमचं नियोजन बघितलं पाहिजे आणि मग विचार केला पाहिजे की चूक कुठे झाली. जर त्यांनी असं केलं तर पुढच्या २ मॅचमध्ये भारत जिंकू शकतो. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरशिवाय असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला जर भारताला हरवता येत नसेल, तर कर्णधार, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा खरच फायदा होतोय का? याचा विचार निवड समितीनं करायला हवा, अशी बोचरी टीका गावसकर यांनी केली.