नवी दिल्ली : भारतीय टीमच्या मायदेशातल्या विजयाला अखेर ब्रेक लागला आहे. ४ वर्षानंतर भारताने मायदेशामध्ये वनडे सीरिज गमावली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा ३५ रननी पराभव झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाने ही सीरिज ३-२ने जिंकली आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यानंतर सीरिज गमावण्याची नामुष्की भारतावर ओढावली आहे. मागच्या ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने भारतात वनडे सीरिज जिंकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २७३ रनचा पाठलाग करताना भारताला २३७ रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मागच्या मॅचमध्ये शतक करणारा शिखर धवन या मॅचमध्ये स्वस्तात आऊट झाला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारतीय इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. विराट कोहली २० रनवर आऊट झाला, तर रोहित शर्माने सर्वाधिक ५६ रन केले.


रोहितची विकेट गेल्यानंतर भारताची बॅटिंग गडगडली, पण पुन्हा एकदा केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने भारताच्या अपेक्षा वाढवल्या. भुवनेश्वरने ४६ रनची आणि केदार जाधवने ४४ रनची खेळी केली. पण या दोघांना भारताला विजयापर्यंत पोहोचवता आलं नाही.


ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स, मार्कस स्टॉयनीस आणि जाय रिचर्डसनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर नॅथन लायनला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.


शेवटच्या वनडेमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला ५० ओव्हरमध्ये २७२/९ पर्यंत मजल मारता आली. ओपनर उस्मान ख्वाजाने १०६ बॉलमध्ये १०० रनची खेळी केली. तर पीटरहॅण्ड्सकॉम्बने ६० बॉलमध्ये ५२ रन केले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. कुलदीप यादवला एक विकेट घेण्यात यश आलं. तर ऑस्ट्रेलियाचा एक बॅट्समन रनआऊट झाला.


वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज होती. वर्ल्ड कपआधीची सीरिज गमावल्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. याआधी ऑक्टोबर २०१५ साली भारताने भारतात सीरिज गमावली होती. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३-२ ने पराभव केला होता. त्यानंतर आता ४ वर्षांनी भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.


रोहितचं रेकॉर्ड


या मॅचमध्ये रोहितने वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रनचा टप्पा गाठला तसंच ओपनर म्हणून रोहितच्या नावावर वनडेमध्ये ६ हजार रनही झाले आहेत. ओपनर म्हणून रोहित शर्मानं सगळ्यात जलद ६ हजार रनचा टप्पा गाठला आहे. १२१व्या डावामध्ये रोहित शर्माने हा विक्रम केला आहे. याआधी हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होतं. हाशीम आमलाने १२३ डावांमध्ये आणि सचिन तेंडुलकर याने १३३ डावांमध्ये ओपनर म्हणून ६ हजार रन केले होते.


याचबरोबर रोहित शर्माने या मॅचमध्ये सौरव गांगुलीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रन झाल्या आहेत. रोहित शर्मा आणि सौरव गांगुली या दोघांनी २०६व्या वनडे इनिंगमध्ये हे रेकॉर्ड केलं आहे. सगळ्यात जलद ८ हजार रन पूर्ण करण्याच्याबाबतीत सौरव गांगुली आणि रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या आणि एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने १७५ वनडे इनिंगमध्ये आणि एबीने १८२ वनडे इनिंगमध्ये ८ हजार रनचा टप्पा ओलांडला होता.