म्हणून ५ वर्षानंतर धोनीऐवजी कार्तिकला संधी मिळाली
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दिनेश कार्तिकनं विकेट कीपिंग केली.
माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दिनेश कार्तिकनं विकेट कीपिंग केली. या संधीसाठी दिनेश कार्तिकला ५ वर्ष थांबावं लागलं. एम.एस.धोनी या सामन्यात खेळत नसल्यामुळे ५ वर्षानंतर दिनेश कार्तिकला विकेट कीपिंगची संधी मिळाली. धोनी टीममध्ये असल्यामुळे आत्तापर्यंत कार्तिकला फक्त बॅट्समन म्हणून खेळवलं जात होतं.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारत धोनीशिवाय मैदानात उतरला. धोनीच्या मांसपेशीला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही, असं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं सांगितलं. पण धोनीची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही.
या मॅचमध्ये कार्तिकनं ४ कॅच पकडले. ३३ वर्षांच्या दिनेश कार्तिकची ही ९०वी एकदिवसीय मॅच होती. यातल्या फक्त २५ मॅचमध्ये कार्तिकनं विकेट कीपिंग केली आहे. या २५ मॅचमध्ये विकेट कीपर असताना कार्तिकनं ४१ बळी घेतले. यामध्ये ३४ कॅच आणि ७ स्टम्पिंगचा समावेश आहे.
दिनेश कार्तिकनं या मॅचआधी ५ मार्च २०१४ साली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात विकेट कीपिंग केली होती. त्या मॅचमध्ये कार्तिकनं एक कॅच पकडला होता आणि २१ धावांची नाबाद खेळी केली होती. भारतानं ती मॅच ८ विकेटनं जिंकली होती. स्वत: विकेट कीपर असलेला दिनेश कार्तिक धोनीच्या नेतृत्वात सर्वाधिक २९ मॅच खेळला आहे. यामध्ये त्यानं २९.१२च्या सरासरीनं ६९९ धावा केल्या आहेत.
दिनेश कार्तिक धोनीशिवाय सहा कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला आहे. यामध्ये राहुल द्रविड, सौरव गांगुली, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, रोहित शर्मा यांचा समावेश आहे. कार्तिकनं कोहलीच्या नेतृत्वात २२, द्रविडच्या नेतृत्वात २१, रोहित शर्माच्या नेतृत्वात ८ मॅच खेळल्या. तर सेहवाग आणि रैनाच्या नेतृत्वात ४-४ आणि गांगुलीच्या नेतृत्वात २ मॅच खेळल्या.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द पाहिली तर दिनेश कार्तिक धोनीचा वरिष्ठ खेळाडू आहे. कार्तिकनं पहिला एकदिवसीय सामना सप्टेंबर २००४ साली खेळला. तर धोनीनं याच्या २ महिन्यानंतर पहिला एकदिवसीय सामना खेळला. दिनेश कार्तकिनं पहिली कसोटी नोव्हेंबर २००४ साली तर धोनीनं पहिली कसोटी डिसेंबर २००५ साली खेळली.