वेलिंग्टन : भारताविरुद्धची वनडे सीरिज ४-१नं गमावल्यानंतर न्यूझीलंड टीमला आणखी एक धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गप्टील पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० सीरिज खेळू शकणार नाही. गप्टीलच्या जागी ऑलराऊंडर जिमी निशमची निवड झाली आहे. निशम भारताविरुद्धच्या शेवटच्या २ वनडेमध्ये खेळला होता. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले 'पाच दिवसांमध्ये आम्हाला तीन मॅच खेळायच्या आहेत. मार्टिन गप्टील त्याच्या दुखापतीतून अजूनही सावरू शकलेला नाही. गप्टील आमच्या टीमचा महत्त्वाचा हिस्सा आहे. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ द्यावा लागेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्टिन गप्टीलला भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडे मॅचआधी दुखापत झाली होती. आता बांगलादेशविरुद्ध पुढच्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या सीरिजवर गप्टीलचं लक्ष असेल. भारताविरुद्धच्या तीन टी-२० मॅच ६ फेब्रुवारीला वेलिंग्टनमध्ये, ८ फेब्रुवारीला ऑकलंडमध्ये आणि १० फेब्रुवारीला हॅमिल्टनमध्ये होईल.


वनडे सीरिजमध्ये गप्टील अपयशी


मार्टिन गप्टील हा न्यूझीलंडचा प्रमुख बॅट्समन आहे. पण भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये तो अपयशी ठरला. सीरिजच्या सुरुवातीलाच नेपियरमध्ये गप्टील शून्यवर आऊट झाला होता. माऊंट माऊनगुनईमध्ये तो १५ आणि १३ रनवर आऊट झाला. हॅमिल्टनमध्ये झालेल्या वनडेमध्येही त्याला १४ रनच करता आले.


टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड शानदार आहे. आत्तापर्यंत भारताला न्यूझीलंडमध्ये एकही टी-२० मॅच जिंकता आलेली नाही. न्यूझीलंडच्या टीममध्ये युवा ऑलराऊंडर डॅरिल मिचेलचीही निवड करण्यात आली आहे. डॅरिल मिचेल हा न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक जॉन मिचेल यांचा मुलगा आहे.


न्यूझीलंडची टीम


केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलीन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्युसन, स्कॉट कुगेलिन, डॅरिल मिचेल, कॉलीन मुन्रो, जिमी निशम, मिचेल सॅण्टनर, टीम सेयफर्ट, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर