आयसीसीचा पाकिस्तानला झटका, बीसीसीआयविरुद्धचा भरपाईचा दावा फेटाळला
आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे.
दुबई : आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयविरुद्ध केलेला नुकसान भरपाईचा दावा आयसीसीनं फेटाळून लावला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सीरिज होत नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं नुकसान होत आहे. या नुकसानाची भरपाई बीसीसीआयनं द्यावी अशी मागणी पीसीबीनं केली होती. याबद्दलची याचिका आयसीसीच्या विवाद निवारण पॅनलकडे होती. अखेर पॅनलनं पीसीबीची याचिका फेटाळून लावली.
बीसीसीआयनं पीसीबीसोबतचा करार मोडला आणि सीरिज खेळायला नकार दिला. त्यामुळे आम्हाला ४४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पीसीबीनं केली होती. करारानुसार २०१५ ते २०२३ पर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये ६ द्विपक्षीय सीरिज होणं अपेक्षित होतं. पण हा करार मानणं आमच्यासाठी बंधनकारक नसल्याचं उत्तर बीसीसीआयनं दिलं. यानंतर पीसीबीनं आयसीसीकडे धाव घेतली. आयसीसीच्या विवाद निवारण पॅनलच्या ३ सदस्यांनी ३ ऑक्टोबरपर्यंत या याचिकेवर सुनावणी घेतली.
भारताचे माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद भारताकडून या सुनावणीसाठी हजर होते. सुरक्षेच्या कारणांमुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू शकत नाही, असं खुर्शीद यांनी या सुनावणीवेळी सांगितलं. नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध बिघडले. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाऊन एकही मॅच खेळला नाही. आता वर्ल्ड कप आणि आशिया कप या आयसीसीच्या स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तानच्या मॅच होतात.