लखनऊ : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी दुसरी टी-२० मॅच होणार आहे. लखनऊमध्ये संध्याकाळी हा सामना रंगेल. पण त्याआधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं इथल्या स्टेडियमचं नाव बदललं आहे. इकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं नाव असलेल्या या स्टेडियमचं नाव आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं ठेवण्यात आलंय. शहर नियोजन खात्याचे मुख्य सचिव नितीन रमेश गोकर्ण यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखीलेश यादव मुख्यमंत्री असताना इकना स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. या स्टेडियमचं उद्घाटन २०१७ साली करण्यात आलं होतं. तब्बल २४ वर्षानंतर लखनऊमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन होणार आहे. याआधी १९९४ साली श्रीलंकेविरुद्ध लखनऊच्या केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात आली होती. यानंतर सगळ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलच्या मॅच कानपूरमध्ये खेळवण्यात आल्या. या नव्या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेऊ शकतात. 


कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ५ विकेटनं विजय झाला होता. वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या ११० रनचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनचा दम निघाला होता. या चुकीपासून शिकण्याची संधी भारतीय टीमला असल्याचं वक्तव्य भारताचा कर्णधार रोहित शर्मानं केलं होतं. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे. लखनऊमध्ये होणारी ही दुसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.