Harmanpreet Kaur Smashes Stumps: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली एक कृती सध्या क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. बंगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये हरमनप्रीतला एलबीडब्ल्यू बाद घोषित करण्यात आल्यानंतर तिने बॅटने स्टम्प उडवले. पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन हरमनप्रीत पव्हेलियनकडे चालू लागली. मात्र पव्हेलियनकडे जाताना ती रागारागात पंचांना काहीतरी बोलत असल्याचं दृष्यही कॅमेरात कैद झालं. यानंतर हरमनप्रीतने सामाना संपल्यानंतर या प्रकरणाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. 


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, बंगलादेशच्या संघाने भारतीय संघासमोर 226 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना हरमनप्रीत 34 व्या षटकामध्ये बाद झाली. भारतीय संघाला 225 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामना अनिर्णित राहिला. ही मालिका 1-1 च्या बरोबरीमध्ये सुटली. सामान्यामध्ये मोहम्मद कमरुज्जमान आणि तन्वीर अहमद हे दोन पंच होते. दोन्ही पंच मूळचे बंगलादेशचेच होते. भारत-बांगलादेश सामन्यानंतर हरमनप्रीतने घडलेल्या प्रकाराबद्दल उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. "पंचगिरी फार सुमार दर्जाची झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर असे निर्णय फारच निराशाजनक वाटतात," असं हरमनप्रीतने उघडपणे सांगितलं. 


पुढल्या वेळेस बांगलादेशमध्ये येऊ तेव्हा...


सामाना संपल्यानंतर हरमनप्रीतने प्रेझेन्टेशन सेरेमनीदरम्यान यावरुन नाराजी व्यक्त केली. "या सामन्यात आम्हाला बरंच काही शिकता आलं. ज्या पद्धतीचे निर्णय पंचांनी दिले ते पाहून संपूर्ण संघालाच आश्चर्य वाटलं. पुढील वेळेस आम्ही जेव्हा बांगलादेशमध्ये येऊ तेव्हा लक्षात ठेऊ की येथील पंच असेच निर्णय देणार आहेत. आम्ही आता क्रिकेटबरोबरच या गोष्टींसाठीही तयार असू," असं हरमनप्रीत म्हणाली.


ते चांगलं खेळले पण...


बांगलादेशच्या संघाने 225 धावांपर्यंत मजल मारली. यासंदर्भात बोलताना हरमनप्रीतने, "त्यांनी चांगली फलंदाजी केली. अनेक महत्त्वाच्या क्षणी ते एक-एक धाव जमवत राहिले. अनेक प्रसंगी आम्ही सुद्धा त्यांना सहज धावा जमवू दिल्या. आमची सामन्यावर पकड होती. मात्र मी म्हटलं त्याप्रमाणे पंचांचे अनेक निर्णय फार वाईट होते. त्यामुळे आम्ही नक्कीच निराश झालो," असं म्हटलं.


बांगलादेशच्या कर्णधाराने केली टीका


"ती आऊट नसती तर पंचांनी तिला बाद घोषित केलं नसतं. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच असलेल्या व्यक्ती या सामन्यात पंच होत्या म्हणजे त्या चांगल्या होत्या. तिने (हरमनप्रीतने) 5 कॅच आणि 2 रन आऊटसंदर्भात ती काहीच बोलली नाही. आमच्याही खेळाडूंना बाद घोषित करण्यात आलं पण आम्ही तक्रार केली नाही. पंचांचा निर्णय अंतिम असतो. आपल्याला तो आवडला नाही तरी मान्य करावा लागतो," असं बांगलादेशची कर्णधार निगर सुल्ताना म्हणाली.  



स्मृती मंधानाने पंचांना केलं लक्ष्य


पत्रकार परिषदेमध्ये भारताची उपकर्णधार स्मृति मंधानानेही आपलं मत मांडलं. "हरमनने जे काही केलं ते रागाच्याभरात केलं. चुरशीच्या सामन्यांमध्ये असे प्रकार घडतात. तिला फक्त तिच्या संघाला जिंकून द्यायचं होतं. त्यामुळे ती थोडी भावूक झाली," असं म्हणत स्मृतिने हरमनप्रीतची बाजू घेतली.