मुलींच्या बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी वडिलांनी सोडली नोकरी, आईचे दागिने गहाण
ते दररोज पहाटे चार वाजता उठून आपल्या मुलींसोबत बॉक्सिंगचा सराव करतात.
लखनऊ: आपण आतापर्यंत पालकांनी मुलांना काबाडकष्ट करून वाढवल्याच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी काहीजण अक्षरश: जिवाचे रान करतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील कुटुंबाची अशीच प्रेरणादायी कहाणी नुकतीच समोर आली आहे.
'दंगल' चित्रपट पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या कस्टम विभागात नोकरी करणाऱ्या रमेश रावत यांनी आपल्या मुलींच्या भविष्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. रावत यांच्या मुली बॉक्सिंग खेळतात. त्यांना यामध्ये चांगली गतीदेखील आहे. त्यामुळे रावत यांनी नोकरी सोडून मुलींच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. ते दररोज पहाटे चार वाजता उठून आपल्या मुलींसोबत बॉक्सिंगचा सराव करतात.
रमेश रावत यांना तरुणपणात बॉक्सिंग आणि कुस्तीची आवड होती. मात्र, घरातून प्रोत्साहन न मिळाल्यामुळे ते फार प्रगती करू शकले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलींसोबत असे होऊन द्यायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला.
रावत यांची मोठी मुलगी मानसी हिने राज्यस्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य व कांस्यपदक पटकावले आहे. तर लहान मुलगीही मोठ्या स्पर्धांसाठी कसून तयारी करत आहे. नोएडात बॉक्सिंग प्रशिक्षणाच्या चांगल्या सुविधा नसल्यामुळे रावत यांनी दिल्लीत स्थायिक व्हायचे ठरवले. त्यासाठी रावत यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे रावत यांच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.
त्यामुळे रावत यांच्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली. याच पैशातून त्यांच्या दोन्ही मुली प्रशिक्षण घेत आहेत. तर रावतदेखील लहानसहान काम करून कुटुंबाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही झाले तरी मुलींच्या प्रशिक्षणात खंड पडून देणार नाही, असे रावत यांनी सांगितले.