मोहाली : दुधाने पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो, असं म्हणतात. आयपीएलमध्ये पंजाबचा कर्णधार आर.अश्विनविरुद्ध खेळताना बॅट्समन तसेच वागत आहेत. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा डेव्हिड वॉर्नरही अश्विनविरुद्ध सतर्क होता. या मॅचमध्ये वॉर्नरने ७० रनची खेळी केली असली तरी त्याला हैदराबादला विजय मिळवून देता आला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये अश्विनने जॉस बटलरला मंकडिंग करून आऊट केलं. अश्विनच्या बॉल टाकण्याआधीच नॉन स्ट्रायकर एन्डला उभा असलेला बटलर क्रिज सोडून पुढे जात होता. यामुळे अश्विनने बटलरला माघारी धाडलं. अश्विनने आपल्यालाही मंकडिंग करू नये, यासाठी हैदराबादच्या वॉर्नरने सावध पवित्रा घेतला.


अश्विन जेव्हा बॉलिंग करत होता तेव्हा हैदराबादचे बॅट्समन क्रिज सोडत नव्हते. एकदा डेव्हिड वॉर्नरने क्रिज सोडण्याचा प्रयत्न केला पण समोर अश्विन असल्यामुळे वॉर्नरने लगेच आपली बॅट क्रिजमध्ये ठेवली. हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.



आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या १२ मोसमांमध्ये पहिल्यांदाच मंकडिंगची घटना घडली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अश्विनने नियमांप्रमाणेच बटलरला आऊट केल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं होतं.