आयपीएल २०१८ ...त्यामुळे भाव नसलेल्या क्रिस गेललाही मिळाला भाव!
मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.
बंगळुरू: क्रिस गेल हे तसे भलतेच वादग्रस्त प्रकरण. मैदानावरही आणि मैदानाबाहेरही. क्रीडा विश्व आणि क्रिकेट वर्तुळालाही चांगलेच परिचीत. प्रसिद्धीसोबत क्रिस गेल याचे जवळचे नाते. त्यामुळे मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बोली लागली. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बोली लागण्याची कहणीही मोठी मजेशीर आहे. पंजाबचा मेंटॉर आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने ही कहाणी सांगितली आहे.
....म्हणून अनसोल्ड राहिला क्रिस गेल
आयपीएल २०१८च्या लिलावासाठी पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिलेल्या ख्रीस गेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावच्या दुसऱ्या दिवशी विकत घेतले. बेस प्राईस 2 कोटी त्याच्यावर बोली लागली. जी किंग्ज इलेव्हन पंजाबने सहज देऊ केली. क्रिस गेल तसा उत्कृष्ट फलंदाज. टी-२०मध्ये तब्बल २० शतकं आणि ११ हजारांहून अधिक धावा अशी भली थोरली कामगिरी त्याच्या नावावर आहे. तसेच, जगभरातील अनेक ठिकाणी पार पडलेल्या टी-२० सामन्यांमध्येही गेलने केलेली कामगिरी उत्कृष्टच आहे. पण, या आधीच्या आयपीएलच्या मोसमात गेल नावाचे वादळ अनपेक्षीतपणे थंडावल्याचे दिसले. त्यामुळे फ्रॅन्चायजी त्याच्यावर नाराज होते. याच कारणामुळे तो आयपीएलच्या पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला.
क्रिस गेलवर बोली लागली आणि...
दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाबने बेस प्राईस २ कोटींवर गेलला खरेदी केले आणि उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला. त्याची विक्री होताच सर्व फ्रॅंचायझींनी टाळ्या वाजवल्या आणि पंजाबचे स्वागत केले. त्यानंतर विरेंद्र सेहवागने दिलेली प्रतिक्रीया फार बोलकी होती.
गेलबद्धल काय म्हणाला सेहवाग?
क्रिस गेलच्या निवडीबाबत सेहवाग म्हणाला, 'सलामीवीर म्हणून कोणत्याही संघासाठी प्रचंड धोकादायक असलेल्या क्रिस गेलचे संघात असणंच पुरेस आहे. संघाने गेलवर दोन कोटी रूपये खर्च केले आहेत. मार्केटींग स्ट्रॅटेजीचा विचार करता ते योग्यच आहे. त्याची ब्रॅंड व्हॅल्यूही चांगली आहे. अर्थात तो जास्त सामने खेळू शकणार नाही. पण, एक बॅकअप सलामीवीर म्हणून संघाचा एक भक्कम आधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल', असेही सेहवागने म्हटले आहे.