मुंबई इंडियन्सचं मनोबल वाढवण्यासाठी तेंडुलकर-अंबानी मैदानात
आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सची टीम यावेळी चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सची टीम यावेळी चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या मोसमातली पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच रंगेल. मुंबईच्या टीमनं आयपीएल लिलावाआधी रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डला कायम ठेवलं. तर लिलावामध्ये जसप्रीत बुमराह आणि कृणाल पांड्याला लिलावावेळी राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा टीममध्ये घेतलं.
हे खेळाडू टीममध्ये नाही
याआधी मुंबई इंडियन्सना आयपीएल जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हरभजन सिंग, अंबती रायडू, मिचेल जॉनसन आणि नितीश राणा हे खेळाडू आता मुंबईच्या टीममध्ये नाहीत. जेसन बेहरनेडॉर्फ जखमी झाल्यामुळे त्याच्याऐवजी मुंबईनं न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलेनघनला पुन्हा टीममध्ये घेतलं.
युवा खेळाडूंना संधी
या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सनं युवा खेळाडूंना संधी दिली आहे. वेस्ट इंडिजचा ओपनर एव्हिन लुईस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेला डावखुरा स्पिनर अनुकूल रॉय मुंबईच्या टीममध्ये आहेत.
परदेशी खेळाडूंचाही भरणा
दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी, ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स आणि बांग्लादेशचा मुस्तफिजुर रहमान यांनाही मुंबईनं लिलावात विकत घेतलं. पॅट कमिन्सनं नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं.
अंबानी-तेंडुलकर मैदानात
आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी मुंबईनं सरावाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी मैदानात सचिन तेंडुलकर आणि मुंबईच्या टीमचे मालक मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी पोहोचले होते.