जयपूर : अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकानंतरही दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा पराभव झाला. ऋषभ पंतने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे अजिंक्य रहाणेचं शतक वाया गेलं. या मॅचमधली ऋषभ पंतची विस्फोटक बॅटिंग सगळ्यांच्याच लक्षात राहिली असली, तरी राजस्थानच्या एश्टन टर्नरने नकोश्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. अशाप्रकारचं रेकॉर्ड करणारा टर्नर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लागोपाठ ५ टी-२० मॅचमध्ये शून्य रनवर आऊट होण्याचा विक्रम एश्टन टर्नरने केला आहे. आयपीएलमध्ये दिल्ली, मुंबई आणि पंजाबविरुद्ध खेळलेल्या मॅचमध्ये टर्नर पहिल्याच बॉलला आऊट झाला. त्याआधी भारताविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये टर्नरने ५ बॉलमध्ये शून्य रन केले. बिग बॅश लीगमध्येही स्ट्रायकर्सविरुद्ध टर्नर पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये परतला.



दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये ईशांत शर्माने टाकलेला स्लो बॉल टर्नरला कळलाच नाही. बॉल यायच्याआधीच टर्नरने बॅट फिरवली, यामुळे त्याच्या बॅटच्या एजला बॉल लागून शेरफेन रदरफोर्डने कॅच पकडला.


राजस्थानने दिलेले १९२ रनचे आव्हान दिल्लीने शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. दिल्लीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.  राजस्थानने २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १९१ रन केले. रहाणेने ६३ बॉलमध्ये १०५ रन केल्या. यामध्ये ११ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.


राजस्थानने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनने २७ बॉलमध्ये ५४ रन केले. तर पृथ्वी शॉने ३९ बॉलमध्ये ४२ रनची खेळी केली. धवन आणि पृथ्वी शॉ या ओपनरनी दिल्लीला ७ ओव्हरमध्येच ७२ रनची पार्टनरशीप करून दिली. यानंतर दिल्लीने २ विकेट झटपट गमावल्या. मग ऋषभ पंतने ३६ बॉलमध्ये ७८ रन केले. ऋषभ पंतने ६ फोर आणि ४ सिक्स मारले.