चेन्नई : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ७ विकेटने विजय झाला. या विजयाबरोबरच चेन्नईचा फास्ट बॉलर दीपक चहर याने विक्रमाला गवसणी घातली आहे. बुमराह, भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा आणि कगिसो रबाडा यासारख्या दिग्गजांना जे करता आलं नाही ते दीपक चहरने करून दाखवलं आहे. आयपीएल इतिहासात एका मॅचमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचं रेकॉर्ड दीपक चहरने केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या दीपक चहरने मंगळवारी कोलकात्याविरुद्धच्या मॅचवेळी ४ ओव्हरमध्ये २० डॉट बॉल टाकले. याआधी आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचं रेकॉर्ड राशिद खान आणि अंकित राजपूत यांच्या नावावर होतं. या दोघांनी १८-१८ बॉल डॉट टाकले होते.


२६ वर्षांच्या दीपक चहरने कोलकात्याचा क्रिस लिन (०), रॉबिन उथप्पा(६) आणि नितीश राणा (०) या खेळाडूंना आऊट केलं. या कामगिरीबद्दल दीपक चहरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. चहरने ४ ओव्हरमध्ये २० रन देऊन ३ विकेट घेतल्या.


पंजाबविरुद्धच्या मॅचवेळी याच दीपक चहरवर धोनी संतापला होता. धोनीनं झापल्यानंतर चहरच्या कामगिरीमध्ये मात्र चांगलीच सुधारणा झाली आहे. महेंद्र सिंह धोनी त्याच्या कूल स्वभावासाठी ओळखला जातो. मॅचदरम्यान कितीही गंभीर परिस्थिती असो, परंतू धोनी संयम सोडत नाही. पण पंजाब विरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचदरम्यान धोनी बॉलर दीपक चहरवर संतापल्याचे पाहायला मिळाले.


पंजाबला विजयासाठी चेन्नईने १६१ रनचे आव्हान दिले होते. पंजाबला अखेरच्या २ ओव्हरमध्ये ३९ रनची गरज होती. त्यावेळी धोनीने दीपक चहरला बॉलिंगसाठी बोलावले. दीपक चहरने आपल्या बॉलिंगदरम्यान सलग २ नो बॉल टाकले. त्यामुळे धोनी मैदानातच भडकला आणि धोनीने चहरच्या दिशेने जात त्याला भरमैदानात सर्वांसमोर चांगलेच सुनावले. कोणत्या दिशेला बॉलिंग करावी याचे धडे धोनीने चहरला दिले. धोनीने सांगितलं आणि अपयशी ठरलं, असं शक्यच नाही.



धोनीने सुनावल्यानंतर त्वरित फायदा झाल्याचे मिळालं. दीपक चहरने पंजाबच्या डेव्हिड मिलरला बोल्ड केले. या सगळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.