जयपूर : अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही राजस्थानचा दिल्लीने ६ विकेटने पराभव केला आहे. राजस्थानने ठेवलेल्या १९२ रनचा पाठलाग दिल्लीने १९.२ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून केला. दिल्लीकडून ऋषभ पंतने विस्फोटक खेळी केली. पंतने ३६ बॉलमध्ये ७८ रन केले. यामध्ये ६ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. राजस्थानने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनने २७ बॉलमध्ये ५४ रन केले. तर पृथ्वी शॉने ३९ बॉलमध्ये ४२ रनची खेळी केली. धवन आणि पृथ्वी शॉ या ओपनरनी दिल्लीला ७ ओव्हरमध्येच ७२ रनची पार्टनरशीप करून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानकडून श्रेयस गोपालने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर धवल कुलकर्णी आणि रियान परागला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंगला आलेल्या राजस्थानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संजू सॅमसन शून्य रनवर आऊट झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ यांनी राजस्थानच्या इनिंगला आकार दिला. अजिंक्य रहाणेनं शानदार अशी शतकी खेळी केली. रहाणेने ६३ बॉलमध्ये १०५ रन केले. यामध्ये ११ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. तर स्टीव्ह स्मिथने ३२ बॉलमध्ये ५० रन केले.


दिल्लीच्या कागिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा, अक्सर पटेल आणि क्रिस मॉरिसला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. अजिंक्य रहाणेचं आयपीएलमधलं हे दुसरं शतक होतं. याआधी ७ वर्षांपूर्वी रहाणेने बंगळुरूविरुद्ध शतक केलं होतं.


राजस्थानविरुद्धच्या विजयामुळे दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली आहे. तर या मॅचमुळे मुंबईचंही नुकसान झालं आहे. दिल्लीच्या विजयामुळे दुसऱ्या क्रमांकावर असणारी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर चेन्नईची टीम पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे.


दिल्लीने आत्तापर्यंत खेळलेल्या ११ मॅचपैकी ७ मॅचमध्ये विजय मिळवला आणि ४ मॅचमध्ये पराभव पत्करला. दिल्लीच्या खात्यात आता १४ पॉईंट्स आहेत. तर १४ पॉईंट्ससह चेन्नईही दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने १०पैकी ७ मॅच जिंकल्या आणि ३ मॅच हरल्या. तर मुंबईचा १०पैकी ६ मॅचमध्ये विजय आणि ४ मॅचमध्ये पराभव झाला. १२ पॉईंट्ससह मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.